डॉक्टरअभावी बीएमसीच्या रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, पोस्टमार्टमसाठी पोलिसांनीही लाच मागितल्याचा आरोप
कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु केले. मात्र रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही, असा दावा पालिकेतर्फे करण्यात आला आहे. निशा कसबे असे मुलुंड भागातील गर्भवती महिलेचे नाव आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू झाल्याची वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर बीएमसीतर्फे या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतर शवविच्छेदन करुन पोलीस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी लाच मगितल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु केले. मात्र रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही, असा दावा पालिकेतर्फे करण्यात आला आहे. निशा कसबे असे मुलुंड भागातील गर्भवती महिलेचे नाव आहे. लाच प्रकरणी पोलिसांवर आणि गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पालिकेच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. गर्भवतीसह तिच्या बाळाचाही मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
मुलुंड परिसरातील रहिवासी असलेली आणि 7 महिन्यांची गर्भवती असलेली एक 26 वर्षीय महिला दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी आली होती. संबंधित महिलेला त्याआधी दोन दिवसांपासून ताप होता. या अनुषंगाने आवश्यक ती तपासणी केल्यानंतर तिला रक्त तपासणी करण्याचा आणि लक्षणे आधारित उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला, अशी माहिती महापालिकेने दिली.
मुलुंड येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसुतिगृहात संबंधित महिलेला 27 सप्टेंबर 2021 रोजी दाखल करण्यात आले. त्याच बरोबर गर्भवतीचे रक्तनमुने देखील वैद्यकीय चाचण्यांसाठी पाठवण्यात आले. प्रसुतीगृहात दाखल झाल्यानंतर तिचा ताप कमी झाला होता आणि तिची प्रकृती स्थिर होती, असंही पालिकेने सांगितलं.
गर्भवती महिलेला त्रास
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी गर्भवती महिलेला जुलाबाचा त्रास झाला. यानंतर योग्य उपचार दिल्यावर महिलेची प्रकृती स्थिर झाली होती. परंतु रात्री बारा वाजताच्या सुमारास त्या महिलेस पुन्हा एकदा जुलाबाचा त्रास होण्यासह चक्कर आली होती.
आधी सावरकर रुग्णालयात महिलेला हलवले
या अनुषंगाने त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी महिलेला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ न शकल्याने याबाबत स्थानिक पोलिसांना नातेवाईक उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर महिला रुग्णाला स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयात हलवण्यात आले.
नायर रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय
स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेची परिस्थिती बघून तिला नायर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी देखील नातेवाईक उपस्थित नव्हते. या अनुषंगाने नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित नातेवाईक येईस्तोवर रुग्णाची तब्येत आणखी खालावली, असं महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
मध्यरात्री महिलेचा मृत्यू
यानंतर संबंधित रुग्ण महिलेला स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात तात्काळ हलवण्यात आले. यानंतर कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु केले. मात्र, रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. ज्यानंतर मध्यरात्री 3.22 वाजता महिलेला मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय उपचार क्रमानुसार रुग्ण महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!
गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यास 3 रुग्णालयांचा नकार, उपचारविना रिक्षातच मृत्यू
साताऱ्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साडेआठ महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू?