Vasooli scam : मुंबईत आणखी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा
पैसे न दिल्याने त्याला एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला, असा दावा तक्रारदारातर्फे करण्यात आला आहे
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईतील आणखी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून पोलिस अधिकाऱ्यांनी खबऱ्यांमार्फत 17 लाख रुपये उकळल्याचा आरोप तक्रारदार प्रॉपर्टी डीलरने केला आहे. आंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पैसे देऊनही आरोपी पोलिस अधिकारी वारंवार पैशांची मागणी करत होते. आणखी पैसे न दिल्याने त्याला एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला, असा दावा तक्रारदारातर्फे करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढे तपासासाठी गुन्हे शाखा 10 कडे वर्ग केला होता. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी मारहाण करत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
डीसीपीवर यापूर्वीही वसुलीचा गुन्हा नोंद
या प्रकरणी एक डीसीपी आणि एका पोलिस निरीक्षकावर आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील संबंधित डीसीपीवर यापूर्वीही वसुलीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एक पोलिस निरीक्षक NIA च्या अटकेत असून त्याला खात्यातून बडतर्फ केलं आहे. तर तिसरा आरोपी हा सद्यस्थितीत पोलिस दलात कार्यरत आहे.
खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा
याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.
हेही वाचा :
चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका
केतन तन्ना-सोनू जालानची खंडणी प्रकरणात तक्रार, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा