पाकिस्तानचा मजनू, बॉर्डर पार करुन मुंबईत, लैला नेमकी कुठं गेली? सोशल मीडियावरची दिवानी लव्ह स्टोरी
मुंबईत पाऊल ठेवल्यावर प्रेयसीची पहिली भेट घ्यायची, या मनसुब्याने आमिर निघाला होता. मात्र घडलं भलतंच. मुंबईत आल्यावर त्याला आधी बेड्या पडल्या, नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
मुंबई : प्रेमात सर्व भेदाभेदाच्या भिंती गळून पडतात, असं म्हटलं जातं. मात्र या भिंती देशाच्या सीमा असतील, तर त्याचं पालन करावंच लागतं. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहणारा युवक प्रेमात आंधळा झाला आणि प्रेयसीला भेटण्यासाठी सीमा ओलांडून थेट मुंबईला येण्यासाठी निघाला. परंतु लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या उद्देशाने आलेल्या या तरुणाला बीएसएफने बेड्या ठोकल्या आहेत. त्याचं दैव बलवत्तर म्हणजे त्याला सुरक्षा यंत्रणांनी जागीच गोळ्या घातल्या नाहीत.
काय आहे प्रकरण?
21 वर्षांच्या मोहम्मद आमिरची मुंबईत राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीशी सोशल मीडियावरुन मैत्री झाली. दोघांमध्ये जवळपास दहा महिने चॅटिंग सुरु होतं. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. अखेर दोघांना विरह सहन होईना. आमिरने पाकिस्तानहून थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. 4 डिसेंबरला आमिर बॉर्डर ओलांडून भारतात आला.
राजस्थानमार्गे अवैधरित्या भारतात प्रवेश
प्रेयसीला भेटण्यासाठी आमिर आतुर झाला होता. त्यामुळे भारतात प्रवेश करण्यासाठी त्याने अवैध पद्धतीने सीमा पार केल्या. आमिर पाकिस्तानातील पंजाब प्रांतात बहावलपूरमध्ये राहतो. हा भाग सीमेपासून 40 किलोमीटर दूर आहे. आमिरने राजस्थानच्या श्री गंगानगर भागातील अनुपगढ सेक्टरद्वारे बॉर्डर पार करत भारतात प्रवेश केला.
मुंबईत प्रवेशानंतर बेड्या
आमिरने खरं तर व्हिसासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र तो रद्द झाल्यामुळे त्याने अवैध पद्धतीने सीमा पार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत पाऊल ठेवल्यावर प्रेयसीची पहिली भेट घ्यायची, या मनसुब्याने आमिर निघाला होता. मात्र घडलं भलतंच. भारतात आल्यावर त्याला आधी बेड्या पडल्या, नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने सगळी कहाणी उलगडून सांगितली.
आमिरने दिलेल्या पत्त्यावर तरुणी नव्हतीच
आमिरचे दावे पडताळून पाहण्यासाठी राजस्थान पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं. कांदिवलीत असलेलं तरुणीचं घर शोधून काढण्यासाठी पोलिसांना 24 तासांचा वेळ लागला. कारण आमिरने दिलेल्या पत्त्यावर तरुणी राहत नव्हती. तिचं कुटुंब अन्यत्र शिफ्ट झालं होतं.
अनेक तासांच्या चौकशीनंतर आमिरच्या प्रेयसीने पोलिसांना माहिती दिली, की आमिरशी तिची ओळख लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर झाली. दोघांमध्ये अनेक महिने चॅटिंग सुरु होती. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांना एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती.
1300 किमी अंतर पायी चालण्याची तयारी
पाकिस्तानातील अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या आमिरचं शालेय शिक्षणही अर्धवट झालं आहे. त्याने कुटुंबीयांनाही धड माहिती न देता काही पैसे घेऊन भारत गाठण्याचा निर्णय घेतला होता. पकडलं जाण्याच्या भीतीने 1300 किलोमीटर अंतर पायी चालण्याची त्याने मानसिक तयारी केली होती. बीएसएफने आमिरला भारत-पाक सीमेवर अटक केली. त्याच्याकडे कुठलीही संशयास्पद हत्यारं सापडली नाहीत. त्याला परत पाठवण्याची तयारी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
नागपुरात एकाच दिवशी दोन खून! दुपारच्या रागाचा रात्री बदला; दारु पिण्याच्या वादातून खून
दोन ट्रकची समोरासमोर धडक, सायकलस्वाराचा चेंदामेंदा, जळगावात भीषण अपघात