मीरा रोडमधील हत्याकांड इजिप्तमधल्या डॉक्युमेंट्रीसारखच, पात्र बदलली, प्रकार तोच; काय आहे डॉक्युमेंट्रीत?
मीरा रोड येथील हत्याकांडाचे आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मनोजने ज्या पद्धतीने सरस्वतीची हत्या केली, तशीच हत्या एका डॉक्युमेंट्रीतही दाखवण्यात आली आहे. मात्र, मनोजने ही डॉक्यूमेंट्री पाहिली होती की नाही, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
मुंबई : मीरा रोड येथे झालेल्या अत्यंत भयानक हत्याकांडाने सर्वच हादरून गेले आहेत. या हत्याकांडाबाबतचे रोज नवे खुलासे बाहेर येऊ लागल्याने हत्याकांडाचं गूढ अधिकच वाढलं आहे. आरोपी मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचं हे कृत्य विकृतीचा कळस मानलं जात आहे. इजिप्तमध्येही एका डॉक्युमेंट्रीत अशाच प्रकारची हत्या दाखवण्यात आली होती. त्या डॉक्युमेंट्रीत जे घडलं तेच मनोज सानेनं केलं. फक्त पात्र बदलली. अर्थात मनोज साने याने ती डॉक्युमेंट्री पाहिली नसेल. पण त्या डॉक्युमेंट्रीतही असाच प्रकार असल्याचं समोर आलं आहे.
इजिप्तमधील ही डॉक्युमेंट्रीही एका सत्य घटनेवरच आधारीत आहे. यूट्यूबवर ही डॉक्यूमेंट्री आहे. एक महिला रागाच्या भरात आपल्या नवऱ्याची हत्या करते. त्यानंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडेतुकडे करते आणि नंतर हे तुकडे शिजवते, असं या डॉक्युमेंट्रीत दाखवलं आहे. मनोज साने यानेही सरस्वतीच्या देहाचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर ते शिजवले. नंतर ते भाजले. मिक्सरमध्ये ते बारीक केले आणि काही नाल्यात फेकून दिले तर काही कुत्र्यांना खायला दिले. डॉक्युमेंट्रीत जसं दाखवलं तसंच मनोजने केलं. त्याने ही डॉक्युमेंट्री पाहिली की नाही त्याचा खुलासा होऊ शकला नाही.
त्या घटनेवरून आयडिया सूचली
मनोजने इजिप्तची ही डॉक्यूमेंट्री पाहिली होती की नाही हे कळायला मार्ग नाही. पण त्याने दिल्लीतील एका हत्याकांडावरून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडाची माहिती होती. त्यावरूनच आपण सरस्वतीच्या शरीराचे तुकडेतुकडे केल्याची कबुली त्याने दिली आहे. मात्र, पोलिसांना त्याची ही थिअरी पटली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
100 तुकडे केले
मीरा रोड येथील नयानगरच्या गीता आकाशदीप सोसायटीतील जे विंगमधील सातव्या मजल्यावर ही धक्कादायक घटना घडली. या सातव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 704मध्ये हा प्रकार घडला. त्याची शेजाऱ्यांना गंधवार्ताही नव्हती. मनोज 56 वर्षाचा आहे. तर सरस्वती त्याच्यापेक्षा 24 वर्षाने लहान आहे. गेल्या दहा वर्षापासून दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. या सोसायटीत ते तीन वर्षापासून भाड्याने राहत होते. मनोजच्या दाव्यानुसार, सरस्वती त्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायची. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
सरस्वतीने घरी येऊन विषप्राशन करत आत्महत्या केली. तिचा मृतदेह पाहून मनोज घाबरला. आपल्यावर खुनाचा आरोप येईल या भितीने त्याने तिच्या मृतदेहाचे 100 तुकडे केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. झाड कापण्याच्या कटरने त्याने तीन दिवस मृतदेहाचे तुकडे केले. त्यामुळे त्याच्या संपूर्ण घरात रक्तच रक्त झालं होतं. बाथरूमध्ये अनेक भांड्यात त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. किचनमध्येही भांड्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते.