Mumbai Bike Theft : सुपरबाईकच्या सुपरचोरीचा पर्दाफाश! ट्रायल मागायचा आणि पळून जायचा, बाईकचोराला बेड्या
Mumbai Crime News : सुपर बाईकच्या चोरीप्रकरणी चारकोप आणि ओशिवरा येथे तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या
मुंबई : महागड्या लक्झरी बाईकची (Mumbai Crime News) चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली. चारकोप पोलिसांनी (Charkop Police) ही कारवाई केलीय. महागडी लक्झरी बाईक दिसली की हा चोरटा ट्रायल मागायचा आणि बाईक (Superbike theft in Mumbai) घेऊनच पळून जायचा. अखेर चारकोप पोलिसांनी सुपरबाईकच्या चोरीप्रकरणी चोरट्याला अटक करत चोरीच्या बाईक्सही जप्त केल्या आहेत. जुबेर इरफान सय्यद असं चोराचं नाव असून त्याची आता कसून चौकशी केली जातेय. हा मूळचा हैदराबादचा रहिवासी आहे. तो मुंबईच्या एका हॉटेलात राहत होता. मुंबईत बाईक चोरीच्या उद्देशाने त्यानं एक नामी शक्कल लढवली होती. सुपरबाईक दिसली की त्यांना थांबवायचं. त्यांचं तोंडभरुन कौतुक करायचं. नंतर गोड गोड बोलून सुपरबाईकच्या चालकांकडून एक ट्रायल राऊंड मागायचा आणि मग बाईक घेऊनच पसार व्हायचं, अशी चोरट्याची मोड्स ऑपरेंडी होती.
चारकोप, ओशिवरात तक्रारी
मुंबईत सुपर बाईकच्या चोरीप्रकरणी चारकोप आणि ओशिवरा येथे तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. या या चोरीप्रकरणी 24 वर्षांच्या जुबेर इरफान सय्यद याला अटकही करण्यात आली. आलिशान बाईक चोरण्याच्या छंद या तरुणाला लागला होता. आता या छंदामुळेच या तरुणाला जेलची हवा खावी लागतेय.
चोरासह दोन दुचाकी जप्त
चारकोप पोलिसांनी जुबेरला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींची किंमत 15 ते 20 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली जातेय. आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, त्याला महागड्या आणि आलिशान दुचाकी चालवण्याचा शौक आहे आणि हा शौक पूर्ण करण्यासाठी तो महागड्या आणि आलिशान दुचाकी चोरतो.
सध्या चारकोप पोलीस आरोपी जुबेर सय्यदला अटक केली असून त्याची आता कसून चौकशी केली जातेय. त्याने आतापर्यंत किती महागड्या दुचाकी चोरल्या आहेत, चोरलेल्या दुचाकीचे तो काय करतो, तसेच त्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.