Mira Road Murder : फ्लॅट नंबर 704… रेशनच्या दुकानातून लव्ह स्टोरी सुरू; ‘त्या’ दोन थिअरीतही दम नाही
मीरारोडमध्ये अत्यंत भयानक हत्याकांड समोर आलं आहे. मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची क्रूर हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
मीरा रोड : मीरा रोड येथील हत्याकांडाने सर्वच हादरून गेले आहेत. मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्यची क्रूर हत्या केली. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खायला घातले. मानवतेला काळीमा फासेल अशा पद्धतीने त्याने सरस्वतीची हत्या केली. या घटनेमुळे फक्त मुंबई आणि महाराष्ट्रच नाही तर देश हादरून गेला आहे. मात्र, एवढं होऊनही मनोज सानेच्या चेहऱ्यावर कोणताही गम नव्हता. पश्चात्तापही नव्हता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
मीरा रोड येथील नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीता आकाशदीप सोसायटीत हे भयानक हत्याकांड घडलं. सोसाटीच्या सातव्या माळ्यावरील फ्लॅटनंबर 704मध्ये मनोज साने (वय 56) आणि सरस्वती वैद्य एकत्र राहत होते. दोघेही लिव्ह इनमध्ये होते. दोघे या सोसायटीत भाड्याने राहत होते. मात्र, दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्याने मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती अनाथ होती. ती बोरिवलीच्या अनाथालयात राहत होती. दोघेही दहा वर्षापूर्वी रेशनच्या दुकानात भेटले होते. तेव्हा साने बोरिवलीत राहत होता. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. मनोज अविवाहित आहे. मनोज सरस्वतीसोबत मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहत होता. तर त्याचे कुटुंबीय बोरिवलीत राहत होते.
11 दिवसांपासून कामावरच नाही
सरस्वतीची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सरस्तवीचे चुलत भाऊ घटनास्थळी पोहोचले आहेत. सरस्वतीला आईवडील नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सानेचं रेशनचं दुकान आहे. पण 29 मे पासून हे दुकान बंद आहे. गेल्या 11 दिवसांपासून तो कामावर गेलाच नाही. सरस्वतीच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने पोलिसांसमोर कबुली दिली आहे.
पण सरस्वतीनेच आधीच आत्महत्या केली होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा दावा त्याने केला आहे. तो सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं. त्यातूनच सरस्वतीने रागाच्या भरात विष घेऊन आत्महत्या केल्याचं त्याचं म्हणणं आहे.
ती थिअरी नाकारली
श्रद्धा वालकर हत्याकांडाने प्रभावित होऊन आपण सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली सानेने पोलिसांना दिली आहे. पण पोलिसांना त्याच्या या थिअरीवर विश्वास नाहीये. त्यामुळे पोलीस या हत्याकांडाचा सखोल तपास सुरू केला आहे. तसेच त्याच्या विरोधात भादंवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या थिअरीतही दम नाही
पोलिसांना त्याच्या दुसऱ्या थिअरीतही दम वाटत नाहीये. सरस्वतीच्या शरीराचे तुकडे करून परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याचं त्याने सांगितलं होतं. पण पोलिसांना त्या थिअरीतही दम वाटत नाही. त्याने इतर कुठे तरी सरस्वतीच्या शरीराची विल्हेवाट लावली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तर, मनोज गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कुत्र्यांना काही तरी खाऊ घालत होता. त्यापूर्वी त्याला असं करताना कधीच पाहिलं नव्हतं, असं सोसायटीतील लोकांचं म्हणणं आहे.
4 जूनला हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, 4 जून रोजी त्याने सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर रोज तो तिच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावत होता. त्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. हे तुकडे फेकता यावेत म्हणून त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्याने बाथरूममध्येच तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. त्याच्या किचनमध्येही तुकडे सापडले आहेत. संपूर्ण शरीर उकडलेलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलीस सरस्वतीच्या शरीराच्या सर्व तुकड्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेले शरीराचे अवयव जेजे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
पश्चात्ताप नाही
एवढं क्रूर हत्याकांड झाल्यानंतरही सानेच्या चेहऱ्यावर पश्चात्तापचे कोणतेच संकेत दिसत नाहीये, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या त्याला 8 दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या हत्याकांडप्रकरणी त्याची कसून चौकशी केली जात आहे.