गाडी भाड्याने देतो सांगायचे, नंतर परस्पर विकायचे, नवी मुंबईतील चोरीच्या गाड्या विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मोठ्या कंपन्यांना गाड्या भाड्याने देतो असे सांगून, त्या गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
नवी मुंबई : मोठ्या कंपन्यांना गाड्या भाड्याने देतो असे सांगून, त्या गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी सुरुवातीला गाड्या भाड्याने देत असत. नंतर त्याच गाड्यांचा परस्पर व्यवहार करायचे. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कित्येक जणांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या होत्या. पण आरोपींना जेरबंद करण्यात आलं नव्हतं.
पोलीस आयुक्तांचे तपासाचे आदेश
अखेर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडून 2 कोटी 10 लाखांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी राजेंद्र घेवडेकर अधिक तपास करीत आहेत.
दोघांना बेड्या
गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलीस अनेक दिवसांपासून आरोपींवर पाळत ठेवून होते. आरोपी अंधेरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. या दरम्यान पोलिसांनी छोटेलाल उर्फ राजेश शर्मा याला ताब्यात घेतलं. तसेच त्याचा साथीदार हरिदास शिलोत्रे उर्फ पाटील याला चेंबूर येथून ताब्यात घेण्यात आलं.
आरोपींकडून 31 वाहने जप्त
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून महाराष्ट्र आणि परराज्यातील एकूण 31 वाहने जप्त केली आहेत. पोलीस आयुक्त विपीन कुमार सिंग, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहा पोलीस आयुक्त भरत गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनिल गवळी, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन मोरे आणि पोलीस हवालदार आव्हाड यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा :