उधार दिलेले पैसे परत मागितले, शेजाऱ्याने महिलेसोबत केले असे काही
स्त्री वेश धारण करुन आरोपी महिलेच्या घरात घुसला आणि हल्ला केला. याप्रकरणी बोरिवली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुंबई : उधार दिलेले पाच लाख रुपये परत मागितले म्हणून शेजाऱ्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसरात उघडकीस आली आहे. स्त्री वेश धारण करुन आरोपी महिलेच्या घरात घुसला आणि हल्ला केला. याप्रकरणी बोरिवली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कमलेश हातिम असे अटक करण्यात आलेल्या 34 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
महिला घरी एकटीच राहते
बोरिवली पश्चिम गोराई सेक्टर क्रमांक 1 मधील राज सागर सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर पीडित महिला राहते. पीडित महिला घरी एकटीच राहते. महिलेचा एकुलता एक मुलगा इंजिनियर असून, तो पुण्यात नोकरी करतो. त्यामुळे मुलाच्या अनुपस्थितीत हातिम महिलेची काळजी घेत असे.
महिलेने लॅब सुरु करण्यासाठी आरोपीला पैसे दिले होते
महिलेचा हातिमवर विश्वास बसला होता. कमलेश हातीम हा एका लॅबमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतो. महिलेने त्याला पालघर जिल्ह्यात नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये दिले होते.
महिला पैसे परत मागितल्याने आरोपीने तिच्यावर हल्ला केला
आता महिलेच्या मुलाचे लग्न ठरले होते. त्यामुळे तिला पैशांची गरज असल्याने महिला हातिमकडे पैसे परत मागत होती. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने साडी नेसून महिलेच्या घरात घुसून झोपलेल्या महिलेवर धारदार शस्त्राने वार केले.
महिलेने बोरिवली पोलिसात घेतली धाव
महिलेच्या छातीवर, हातावर आणि पोटावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. पीडितेचे म्हणणे आहे की हातिमने तिच्यावर साडी नेसून हल्ला केला, तेव्हा तिने त्याला ओळखले पण ती त्याला घाबरत होती. महिलेचा मुलगा पुण्याहून आल्यावर त्यांनी पोलिसांना हकीकत सांगितली.
यानंतर बोरिवली पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी हातीमला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.