धक्कादायक! पनवेलमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरी
पनवेल शहरातील पुजारा टेलीकॉममध्ये १९ नोव्हेंबरला २३ लाख ९५ हजार रुपयांचे ५५ मोबाईल फोन चोरीला गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २१ नोव्हेंबरला आरोपी आकाशला अटक केली. आकाश हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून महाविद्यालयाची फी भरण्यासाठी त्याने ही चोरी केली, अशी कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.
पनवेल शहराच्या मध्यभागी असलेल्या पुजारा टेलीकॉम मोबाईल शॉपमध्ये चोरी करून अज्ञात आरोपीने लाखो रुपयांच्या मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना 19 नोव्हेंबरला उघड झालेली. अज्ञात चोरट्याने शटरचे कडी कोयंडा कापून दुकानामधील विक्रीस ठेवलेले नवीन पेटीपॅक आणि जुने असे 23 लाख 95 हजार रूपये किंमतीचे एकूण 55 मोबाईल फोन चोरी करून आरोपी फरार झाला होता. चोरीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला होता.
पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपी येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पाहणी केली असता गुन्ह्यातील आरोपी घटनेच्या रात्री मोटर सायकलवरून घटनास्थळ परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. आरोपी हा उरण परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपीला पनवेल गुन्हे शाखा कक्ष २च्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी पहाटे बेलापूर येथून अटक केली. आरोपीची तपासणी केली असता आरोपीकडून पोलिसांना मोबाईल मिळाले. हे मोबाईल कोणाचे आहेत? याची चौकशी केल्यानंतर हे मोबाईल चोरीचे असल्याची कबुली आरोपीने दिली. इसमाची ओळख पटविली असता सदरची घरफोडी आकाश नावाच्या तरुणाने केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने चोरी का केली?
आरोपी आकाश हा 24 वर्षांचा आहे. तो सध्या उरण येथील फुंडे येथे राहणारा आहे. तू मुळ राहणार सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील एका गावाचा रहिवासी आहे. आकाश उरणमध्ये आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. सध्या आकाश इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात नवी मुंबई परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे धडे गिरवत होता. मात्र हे धडे गिरवताना आकाशचा निर्णय चुकला आणि आकाश पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आरोपी आकाश याची अधिक चौकशी केली असता आकाश हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात असल्याची माहिती मिळाली. ही चोरी का केली याची विचारणा केली असता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याची माहिती आकाशने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.