आमदार गणपत गायकवाड यांचा भर कोर्टात थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप; कोर्टात काय काय घडलं?
भाजपचे नेते आणि कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेमुळे केवळ कल्याणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीने गोळीबार करणं योग्य आहे काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तर, दुसरीकडे गणपत गायकवाड यांना कोर्टात आणण्यात आलं असून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपचे आमदार गणपत गायकवाड एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. हा सुनियोजित कट होता. गायकवाड यांनीच गोळीबार केल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. तर गणपत गायकवाड यांनी भर कोर्टात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात गणपत गायकवाड यांचे कुटुंबीयही होते. यावेळी गायकवाड यांनी कुटुंबीयांना पाहून हात उंचावला आणि स्मित हास्य केलं. गायकवाड यांच्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांना न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं. न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. सुनावणीवेळी गणपत गायकवाड यांनी न्यायाधीशांसमोर मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप करण्यात आला.
कायदा का हातात घ्यावा लागला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. घटना घडली तेव्हा तिथे माझा मुलगा नव्हता. पण पोलिसांनी माझ्या मुलाला आरोपी बनवून त्याला अटक केली आहे, असं सांगतानाच माझ्या सारख्या माणसाला कायदा का हातात घ्यावा लागला? असा सवालच गणपत गायकवाड यांनी केला. शिंदे बापलेकांनी माझ्यावर अन्याय केला. मी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितलं. पण त्यांनीही दुर्लक्ष केलं, असंही गायकवाड यांनी कोर्टात म्हटलं आहे.
14 दिवसांची कोठडी द्या
यावेळी पोलिसांनी कोर्टाला गुन्ह्याची माहिती दिली. गणपत गायकवाड यांनीच फायरिंग केली. बंदूक जप्त करण्यात आली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. गणपत गायकवाड यांच्या आवाजाचे नमूने घ्यायचे आहेत. हा एक सुनियोजित कट आहे अस प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे. गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गायकवाड आणि इतर आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ही कोठडी हवी, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं.
कमी कालावधीत तपास अशक्य
दरम्यान, शिवसेनेचे जखमी महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपी गणपत गायकवाड यांनी जे प्रसारमाध्यांशी संभाषण केलंय ते पडताळण्यासाठी व्हॉइस सँपल घ्यायचे आहेत. हा एक सुनियोजित कट आहे, त्यामुळे कमी पोलीस कोठडीत याचा तपास होणे शक्य नाही, असंही पोलिसांनी कोर्टाला सांगितलंय.