मॅटचा आदेश, पण बदली होत नाही, पोलीस निरीक्षकाची महासंचालक संजय पांडे यांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना नोटीस पाठवली आहे. घाडगे यांनी अवमान याचिका दाखल करण्याबाबत पोलीस महासंचालकांना नोटीस दिली आहे.
मुंबई : पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना नोटीस पाठवली आहे. घाडगे यांनी अवमान याचिका दाखल करण्याबाबत पोलीस महासंचालकांना नोटीस दिली आहे. मॅटच्या आदेशानंतरही बदली होत नसल्याने पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे घाडगे यांनी संजय पांडे यांना नोटीस बजावली आहे. तसेच 25 ऑगस्टपर्यंत बदली न केल्यास आपण कोर्टात जाऊ, असं घाडगे म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे हे ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे नियुक्त होते. तिथून त्यांची बदली ठाण्यापासून 500 किलोमीटर दूर अकोला येथे करण्यात आली. याविरोधात घाडगे हे मॅट कोर्टात गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या विरोधात अनेक खटले आहेत. त्यांच्या सुनावणीसाठी सुट्टी घेऊन यावं लागतं. यामुळे मला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नजीक बदली देण्यात यावी, अशी त्यांनी याचिकेत मागणी केली होती. त्यावर 3 नोव्हेंबर 2020 रोजी मॅटच्या न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी घाडगे यांची बदलीच्या अर्जाचा विचार करावा, असं म्हटलं होतं. त्यानंतर मॅटचे दुसरे न्यायाधीश पी के कुरहेकर यांनीही 4 मार्च 2021 रोजी घाडगे यांची बदली जनरल बदलाच्या वेळी करावी, असे आदेश दिले होते.
पोलीस महासंचालकांना प्रत्यक्ष भेटून बदलीसाठी विनंती
पोलीस निरीक्षक घाडगे यांनी 19 एप्रिल 2021 रोजी अकोला जिल्हा अधीक्षक यांच्यामार्फत बदलीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2021 रोजी त्यांनी स्वतः पोलीस महासंचालक संजय पांडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बदलीचा मुद्दा त्यांच्याकडे मांडला.
294 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नाव न आल्याने घाडगे अस्वस्थ
राज्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा नुकत्याच 14 ऑगस्ट 2021 रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण 294 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचं नाव नाही. या जनरल बदल्या असतानाही त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.
घाडगे यांच्यावर परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन अनेक गुन्हे दाखल
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या विरोधात पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत घाडगे यांनी परमबीर सिग यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका केली आहे. यानंतर आता त्यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना अवमान याचिकेबाबत नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा :
…आणि पोलिसांनी पोलीस ठाण्यातच गर्भवती तरुणीचं प्रियकरासोबत लग्न लावलं
VIDEO : स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात, अतिउत्साही तरुणांचा कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी
अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व मागण्या फेटाळल्या, शेवटचा पर्यायही संपला?