लाखोंची रोकड पाहून नोकराची नियत फिरली, पैसे घेऊन यूपीत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी झडप घातली
पैसे घेऊन आरोपी मुंबईहून बसने कल्याण गेला. कल्याणहून उज्जैनला जाणारी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आरोपी होता. त्यानंतर तो यूपीला पळून जाणार होता.
मुंबई : मालकाने गुजरातला पाठवण्यासाठी दिलेले 35 लाख रुपये घेऊन नोकराने धूम ठोकल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. चोरलेले पैसे घेऊन उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कल्याण स्थानकातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पंकज सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गेल्या महिभरापासून मालकाकडे ड्रायव्हरचे काम करत होता. इतकी मोठी रक्कम पाहिल्यानंतर आरोपीची नियत फिरली. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी पळून जाण्याच्या आतच त्याला अटक करण्यात आले.
मालकाने गुजरातला पाठवण्यासाठी रोकड दिली होती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथे राहणाऱ्या हेमंत अरुण मेहता नावाच्या व्यावसायिकाने 6 जानेवारी रोजी आपल्या नोकराला अंगडियान येथून गुजरातला पाठवण्यासाठी 35 लाखांची रोकड दिली. आरोपीसह व्यावसायिकाचा आणखी एक जुना नोकर होता.
इमारतीच्या सुरक्षारक्षकाने नावाची एन्ट्री करण्यास सांगितले
हे दोघेही पैसे घेऊन कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा येथील साई धाम कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. इमारतीतील सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवून डायरीत नावे टाकण्यास सांगितले.
जुना नोकर दुचाकीवरुन खाली उतरताच आरोपी पैसे घेऊन फरार
डायरीत नाव टाकण्यासाठी व्यावसायिकाचा जुना नोकर दुचाकीवरून खाली उतरला. हीच साधत नवीन नोकर पंकड सिंग हा 35 लाखांची रोकड भरलेली बॅग घेऊन पळून गेला.
कांदिवली पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत आरोपीला पकडले
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपीला कल्याण येथून अटक करत चोरी केलेल्या रकमेपैकी 27 लाखांची रोकड जप्त केली आहे.
पैसे घेऊन आरोपी मुंबईहून बसने कल्याण गेला. कल्याणहून उज्जैनला जाणारी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आरोपी होता. त्यानंतर तो यूपीला पळून जाणार होता. मात्र कांदिवली पोलिसांच्या पथकाने वेगात कारवाई करत आरोपीला महाराष्ट्राबाहेर जाण्यापूर्वीच पकडले आहे.