सहकाऱ्यांची मस्करी तरुणाच्या जीवावर, गुदमार्गात हायप्रेशर हवा भरली, भिवंडीत तरुणाचा मृत्यू
मुन्ना आणि बिट्टूकुमार यांनी अब्दुल अन्सारीची मस्करी करण्याचं ठरवलं. दोघांनी मोठ्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कम्प्रेसरचं नोझल अन्सारीच्या गुदमार्गाजवळ धरलं आणि मशिन स्वीच ऑन केलं. मशिन सुरु होताच हाय प्रेशरने हवा अन्सारीच्या पोटात शिरली
भिवंडी : दोघा जणांची मस्करी तरुणाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात उघडकीस आली आहे. मजे-मजेत दोघा जणांनी सहकाऱ्याच्या गुदमार्गात पंपाद्वारे हवा भरली. मात्र यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
मुन्ना आणि बिट्टूकुमार अशी आरोपींची नावं आहेत. तर अब्दुल अन्सारी असे 32 वर्षीय पीडित मयत तरुणाचं नाव आहे. तो खडीपार भागातील एका चाळीत काम करत होता. मुन्ना, बिट्टूकुमार आणि अन्सारी हे तिघंही जण भिवंडीतील एका पॉवर लूम युनिटमध्ये काम करत होते.
नेमकं काय घडलं?
26 नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मुन्ना आणि बिट्टूकुमार यांनी अब्दुल अन्सारीची मस्करी करण्याचं ठरवलं. दोघांनी मोठ्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कम्प्रेसरचं नोझल अन्सारीच्या गुदमार्गाजवळ धरलं आणि मशिन स्वीच ऑन केलं. मशिन सुरु होताच हाय प्रेशरने हवा अन्सारीच्या पोटात शिरली. पोटात अतिरिक्त हवा झाल्यामुळे तो जागीच कोसळला.
अन्सारीची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र बुधवारी उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.
आरोपींना पोलीस कोठडी
स्थानिक कोर्टात दोघांना हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कलम 304 अन्वये भिवंडीतील निझामपुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुन्ना आणि बिट्टूकुमार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत बायकोची हत्या, नाशिकला जाऊन विषप्राशन, बायकोच्या माहेरच्यांनीच नवऱ्याला नेलं रुग्णालयात
चारवेळा गर्भपात, सासरचे टोमणे, पोटच्या पोरीला मारणाऱ्या ‘वैरीण माते’ने हत्येची कारणं सांगितली
कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद