Kalyan Crime | महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, कल्याणमध्ये संतापजनक घटना
कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. शहरात पुन्हा एकदा एका महिलेवर अतिप्रसंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सुनील जाधव, Tv9 मराठी, ठाणे | 6 ऑक्टोबर 2023 : कल्याण-डोंबिवली शहरात गुन्हेगारीने अक्षरश: हैदोस माजवला आहे. कल्याण शहरात खडपाडा पोलीस ठाणे हद्दीत नुकतंच मित्राने मित्रावर गोळी झाडल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका महिलेवर चोरट्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय. तसेच आरोपींनी महिलेचं मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडलीय. संबंधित घटनेची माहिती तातडीने डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आता तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
संबंधित प्रकार हा डोंबिवली पूर्वेतील एका टेकडीवर घडलाय. पीडित महिला ही टेकडीवर असलेल्या देवस्थानी दर्शनासाठी जात होती. यावेळी वाटेत एका अज्ञाताने तिला अडवलं. नराधम आरोपीने पीडित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने यावेळी आरोपीचा प्रचंड प्रतिकार केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या झटापटीत आरोपी संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांकडून तपास सुरु
संबंधित घटनेनंतर पीडित महिला खूप घाबरली. तिने काही नागरिकांना याबाबतची माहिती दिली. पीडिता खूप घाबरलेली आणि अस्वस्थ होती. काही स्थानिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची फोनवरुन माहिती दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पीडितेने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी यावेळी पीडितेला आधार देण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीला अटक करुन योग्य शिक्षा दिली जाईल, असं पोलिसांनी आश्वासन दिलं.
संबंधित प्रकरणी आता पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. आरोपी नेमका कोण होता? तो एकटा होता की त्याच्यासोबत आणखी कुणी होतं? तो अशाचप्रकारचे कृत्य करतो का? याचा तपास पोलीस करण्याची शक्यता आहे. यासाठी पोलीस रोडवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत घेऊ शकतात. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.