मुंबईच्या RBI बँकेला धमकीचं ई-मेल, 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा, बँकांना उडवून देण्याची धमकी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी एका ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : अरबी समुद्रात भारताच्या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आरबीआयच्या ई-मेल आयडीवर आज सकाळी साडेदहा वाजता ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये आज दुपारी दीड वाजता मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट होतील. आम्ही मुंबईतील 11 ठिकाणी हे बॉम्ब ठेवले आहेत, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती.
आरोपींकडून ई-मेलमधून करण्यात आली मागणी
या ई-मेलच्या माध्यमातून काही मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव घेऊन एक मोठा घोटाळा देशात केला जातोय. त्यामुळे गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ई-मेलमध्ये करण्यात आली होती. तसेच गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी राजीनामा न दिल्यास मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली होती.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
हा ई-मेल प्राप्त होताच, आरोपींनी ज्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता त्याठिकाणी तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. पण या शोध मोहिमेत काही आक्षेपार्ह आढळलं नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु झालाय. हा ई-मेल कुणी केला, त्याचा उद्देश काय होता, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.