Dombivli Crime | महिलेचं अपहरण, निर्जनस्थळी नेलं, कपडे काढायला भाग पाडत अतिप्रसंगाचा प्रयत्न, अचानक चमत्कार घडला, आणि…
डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिला देवदर्शन करुन आपल्या घरी निघाली होती. यावेळी तिच्यासोबत दोन रिक्षाचालकांनी अतिशय घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटना अतिशय संतापजनक आहे.
डोंबिवली | 9 सप्टेंबर 2023 : कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरं महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. कारण या शहरांमध्ये वारंवार महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. विशेष म्हणजे एकामागे एक अशा घटना समोर येत असल्याने आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं आहे की नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आतादेखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेवर दोन रिक्षा चालकांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन परत येत असताना एका महिलेचे रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने अपहरण केले.आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेले, आरोपींनी पीडितेला कपडे काढण्यास भाग पाडत तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. सुदैवाने यावेळी मानपाडा पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोन्ही नराधमांवर झडप घातली. या दरम्यान या दोन नराधमांनी पोलिसांवर हल्ला केला. मात्र धाडसी पोलिसांनी दोघा नराधमांना पकडून महिलेला त्यांच्या तावडीतून वाचविले.
प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे या दोन्ही नराधमाचे नाव आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांना पकडून महिलेच्या जीव आणि आब्रू वाचवणारे धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचे सुधीर हसे, आणि अतुल भोई अशी नावे आहेत. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं जात आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरातून गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. पण रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदार यांनी आपापसात संगनमत करुन एका निर्जनस्थळी नेलं. आरोपींनी रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निवस्त्र करत अतिप्रसंग करण्यास सुरूवात केला. मात्र याच वेळी एक चमत्कार घडला.
आरोपींनी महिलेला रिक्षेतून ढकलून दिलं
रात्री गस्तीवर असणाऱ्या मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अतुल भोई आणि सुधीर हासे सुदैवाने तिथे आले. यावेळी रिक्षामध्ये दोन इसम एका महिलेला रिक्षात बसून तिच्यासोबत अतिप्रसंग करत यासल्याचा संशय आल्याने त्यांनी मोटारसायकलने रिक्षाच्या दिशेने फिरवली. यावेळी आरोपींनी रिक्षा पळवली. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे, असे लक्षात आल्याने त्यांनी महिलेला चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिलं. त्यानंतर आरोपींनी फरार होण्याचा प्रयत्न सुरू केला.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
मात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे या दोन्ही रिक्षा चालकांची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांनी पोलिसांकडून वाचण्यासाठी पोलिसांवर शस्त्राचा हल्ला केला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय. सध्या मानपाडा पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय.
आरोपींवर विनयभंगसह इतर कलमातंर्गत गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी अजून किती ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य केले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र रिक्षा चालकाच्या या घटनेनंतर डोंबिवली परिसरामध्ये रात्री प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.