केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज पोलिसांसमोर पहिली हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला, संपूर्ण घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष
नारायण राणे यांना कोर्टाने महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात दाखल होण्याचा आदेश दिला आहे. तसेच यापुढे असं आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचा आदेश दिलाय.
रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना 30 ऑगस्टला अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे नारायण राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्याच टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी राणेंना अटक केली होती. विशेष म्हणजे राणे यांनी अटकपूर्व जामीनसाठी देखील अर्ज केला होता. पण त्यांचा तो अर्ज फेटाळण्यात आला होता. अखेर महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणे यांना दिलासा मिळाला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महाड कोर्टाकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर बचाव पक्षाकडून राणे यांना जामीन देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना काही अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला.
कोर्टात नेमकं काय घडलं होतं?
महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली होती. जवळपास पाऊण तास दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. महाड पोलिसांनी नारायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळालं होतं.
तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेलं विधान हे सार्वजनिकरित्या केलं होतं. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असं म्हटलं. तसंच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर कलमं लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. तसंच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलंही अटक वॉरंट देण्यात आलं नाही, असा युक्तिवादही करण्यात आला. तसंच राणेंच्या प्रकृतीचं कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना अटीशर्ती ठेवून परवानगी दिली होती.
नेमक्या अटी काय?
नारायण राणे यांना कोर्टाने महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात दाखल होण्याचा आदेश दिला आहे. तसेच यापुढे असं आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचा आदेश दिला. राणेंना पुन्हा तसं वक्तव्य करणार नसल्याचीदेखील ग्वाही दिली. तसेच राणेंना 30 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा, राऊत म्हणतात, मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे!
माझ्या फंदात पडू नकोस; नारायण राणेंचा संजय राऊतांना थेट इशारा
काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान