उल्हासनगरात अत्याचारग्रस्त मुलीचा कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न, महिना उलटला तरी आरोपी मोकाटच
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार आरोपी रोशन माखीजा आणि पंकज त्रिलोकानी या दोघांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उल्हासनगर (ठाणे) : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गुन्हा दाखल होऊन महिना उलटला, तरीही आरोपी मोकाटच असल्यामुळे अत्याचारग्रस्त मुलीसह तिच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आई-वडिलांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त करत ताब्यात घेतलं आहे.
पीडितेच्या आई-वडिलांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार आरोपी रोशन माखीजा आणि पंकज त्रिलोकानी या दोघांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतरही या दोघांना अटक करण्यात आली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी वारंवार पोलीस अधिकार्यांकडे दाद मागितली. तरीही न्याय न मिळाल्यामुळे आज अखेर पीडित मुलीसह तिच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांची प्रतिक्रिया काय?
मात्र पीडित मुलगी आणि तिच्या आई-वडिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी या तिघांनाही आत्मदहन करण्यापासून परावृत्त करत ताब्यात घेतलं आणि पुढील अनर्थ टळला. या तिघांनाही सध्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे. त्यांचं समुपदेशन करण्यात येणार असल्याची, तसंच मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची त्यांना माहिती देण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
आरोपी राजकीय संघटनांशी संबंधित
दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी पंकज त्रिलोकानी आणि रोशन माखीजा हे दोघे राजकीय संघटनांशी संबंधित आहेत. त्यामुळेच पोलिसांकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता. त्यामुळे आता उल्हासनगर पोलीस या दोघांवर कारवाई करतील का? हे मात्र पाहावं लागणार आहे. याप्रकरणात पोलिसांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
महाराष्ट्रात वारंवार बलात्काराच्या घटना
महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. पुणे, अमरावती, उल्हासनगर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटना तसेच मुंबईतील निर्भया हत्याकांडासारखी भयानक घटना ताजी असताना जालना जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अवघ्या 12 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
बदनापूर तालुक्यातील एका गावात मंगळवारी (14 सप्टेंबर) दुपारी पीडित मुलगी घरासमोर एकटी कोंबड्यांना दाणे टाकत होती. यावेळी तिच्या घरात इतर सदस्य नव्हते. याच गोष्टीची संधी साधून बाजूच्या शेतात राहणाऱ्या आरोपी अनवर खान याने मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेलं. तिथे तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. पीडित मुलीने शेतात काम करणाऱ्या आपल्या आईला ही हकीकत सांगितल्याने मुलीच्या आईने बदनापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
VIDEO : नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर, महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई