मुंबईसह देशात पुन्हा घातपात घडवण्याचा कट, देशातील शांतता उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न पाहणारा अनिस नेमका आहे तरी कोण?
दिल्ली पोलिसांनी काल (14 सप्टेंबर) सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे दहशतवादी नव्याने सक्रिय झाले होते. त्यांना गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम याने सक्रिय केलं होतं.
मुंबई : दिल्ली पोलिसांनी काल (14 सप्टेंबर) सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे दहशतवादी नव्याने सक्रिय झाले होते. त्यांना गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम याने सक्रिय केलं होतं. पाकिस्तानच्या आयएसआयसाठी नव्याने स्लीपर सेल तयार करण्याची जबाबदारी आता अनिसवर सोपवण्यात आली आहे. हाच अनिस मुंबईत झालेल्या 1993 सालातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आहे.
दाऊद गॅंगचा मुंबईत दबदबा
दाऊद गॅंगचा मुंबईत दबदबा आहे. या गँगने अनेकदा दहशतवादी कृत्यासाठी मदत केली आहे. मुंबईत 1993 सालात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. एकाच वेळी 12 ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात शेकडो लोक ठार झाली होती तर हजारो लोक जमखी झाले होते. भयावह अशी ही घटना होती. या बॉम्बस्फोटाने देशात खळबळ माजली होती. या बॉम्बस्फोट मागे दाऊद गॅंग असल्याचं त्यावेळी उघडकीस आलं होतं. बॉम्बस्फोट करण्यासाठी दाऊदने मुंबईतील तरुणांना एकत्र केलं होतं. त्यांना दुबई मार्गे पाकिस्तानात नेऊन बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग दिली होती. याच तरुणांनी मग मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
दाऊदचा भाऊ अनिस 1993 सालापासून फरार
या बॉम्बस्फोटसाठी दाऊद गॅंगकडून मोठी तयारी करण्यात आली होती. दाऊद गॅंगचे अनेक मोठे गुंड यासाठी सक्रिय झाले होते. अबू सालेम, त्याचप्रमाणे दाऊदचा सख्खा भाऊ अनिस हा देखील सक्रिय झाला होता. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी दुबईत मीटिंग व्हायच्या. या काही मीटिंगला अनिस स्वतः हजर होता. त्याचप्रमाणे बॉम्बस्फोटबाबत सक्रिय असलेल्या तरुणांना पैसे पुरवण्याची जबाबदारी ही अनिसवर होती. ती जबाबदारीही त्याने पार पाडली होती. जेव्हा घटना घडली, तपास सुरु झाला तेव्हा दाऊद सोबत अनिसचा रोलही तपासात समोर आला होता. यामुळे जेव्हा आरोपपत्र दाखल करण्यात आलं तेव्हा दाऊदसोबत अनिस यालाही फरार घोषित करण्यात आलं आहे. 1993 सालापासून अनिस सीबीआयसाठी फरार आरोपी आहे.
…म्हणून आयएसआय दाऊद गँगची मदत घेते
दिल्लीच्या स्पेशल सेलने काल सहा जणांना अटक केली. यात दोन जण पाकिस्तानी आहेत. ते थेट आयएसआय एजंट आहेत. तर एक जण जान मोहम्मद शेख हा दाऊद गँगसाठी काम करणारा गुंड आहे. जान मोहम्मद याच्या विरोधात एक मारामारीचा गुन्हा दाखल आहे. मात्र, तो मोठ्या प्रमाणात अनिसच्या इशाऱ्यावर आयएसआयसाठी काम करायचा. दाऊद गॅंगचे आजही मुंबई, देशात नेटवर्क आहे. हे नेटवर्क गुंडांचं, हवाला वाल्याचं आहे. शस्त्र वाल्याचं आहे. हे नेटवर्क वापरता यावं म्हणून आयएसआय दाऊद गँगची मदत घेत असते. पूर्वी खुद्द दाऊद सक्रिय होता आता अनिस सक्रिय झाला आहे.
हेही वाचा :
संशयित दहशतवादी जान मोहम्मदकडून गिरगाव चौपाटीची रेकी, मुंबई लोकलचीही पाहणी : सूत्र
पैशांसाठी नाही, ‘या’ कारणासाठी पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण, अटकेतील संशयितांचा खळबळजनक खुलासा