Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?
विरारमध्ये बँकेच्या माजी मॅनेजरने बॅंकेतील कर्मचाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (29 जुलै) रात्री आठ वाजता घडली.
मुंबई : विरारमध्ये बँकेच्या माजी मॅनेजरने बॅंकेतील कर्मचाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (29 जुलै) रात्री आठ वाजता घडली. आरोपीने बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपी 1 कोटी 38 लाखांची रोख आणि सोनं घेवून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. आरोपीने कर्जबाजारीपणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू, तर कॅशियर महिला गंभीर जखमी
संबंधित घटना ही विरार पूर्वेतील स्टेशन परिसरातील ICICI बँकेत गुरुवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली होती. बँक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून बँकेचा माजी मॅनेजर आहे. या हल्ल्यात बॅंकेची असिस्टंट मॅनेजर असलेल्या महिलेचा मृत्यू झालाय. तर कॅशियर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेच्या वेळी बॅंकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी आठ वाजता आयसीआयसीआय बॅंकेच्या विरार पूर्वे शाखेत असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी-वर्तक आणि श्रद्धा देवरुखकर या दोघी उशीरा सायंकाळपर्यंत बॅंकेतच काम करत होत्या. बॅंकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने ओळखीचा फायदा उचलत बॅंकेच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने चाकूने योगिताच्या गळ्यावर-चेहऱ्यावर वार केले.
घटनेचं गांभीर्य ओळखून श्रद्धा हिने बॅंकेची इमरजन्सी अलार्म बेल वाजवली. त्यामुळे बाहेरचे नागरीक सतर्क झाले. मात्र तोपर्यंत आरोपी अनिल दुबे याने श्रद्धावरही अनेक वार केले. त्यात ती देखील गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत श्रद्धाने प्रतिकार केला. पण आरोपीसमोर तिची ताकद कमी पडल्याने त्याने बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानंतर तो बँकेबाहेर पडून फरार होण्यात यशस्वी झाला होता.
बँकेत सुरक्षा रक्षकच नाही
बँकेतील आरडाओरडा पाहून बाजूलाच असणाऱ्या काही जिगरबाज तरुणांनी आरोपीला बॅगेसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित घटनेनंतर आज (30 जुलै) मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पण सुरक्षा रक्षक जर बँकेसमोर असते तर एवढी मोठी घटना घडली नसती. महिलेचा जीव गेला नसता. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मृतक महिलेच्या नातेवाईकांचे बँकेवर आरोप
दरम्यान, श्रध्दा आणि मृतक योगिताच्या कुटुंबियांनी रात्रीच्या सुमारास बॅंकेत सुरक्षारक्षक का नव्हता? असा प्रश्न विचारला आहे. तसेच जर सुरक्षारक्षक असता तर नक्कीच ही घटना घडली नसती, असं म्हणत यात बॅंकेचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृतक योगिताचे 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला 3 वर्षांचा एक मुलगा आहे. तर त्यांचा पती हे फार्मा कंपनीत काम करतात. जखमी श्रद्धा यांनाही 5 वर्षांचा मुलगा आहे.
आरोपी हा अॅक्सिस बँकेत मॅनेजर
आरोपी अनिल दुबे हा सध्या नायगांव येथे अॅक्सिस बॅंकेचा मॅनेजर आहे. आरोपी दुबे हा कर्जबाजारी झाला होता. तो आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विरार पोलिसांनी आज वसई न्यायालयात अनिल दुबेला हजर केलं. वसई न्यायलयाने आरोपीला 6 ऑगस्ट पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : विरारमध्ये ICICI बँकेत सशस्त्र दरोड्याचा थरार, असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू, एकाला अटक