मॉलमधील गेमझोनमध्ये जंपिंग गेम खेळत असाल तर सावधान, बाऊन्स गेमसाठी उडी घेतली अन्…
महाविद्यालयीन तरुण मॉलमध्ये गेमझोनमध्ये खेळायला गेले होते. पण खेळाचा आनंद लुटण्याआधीच तरुणावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली.
मुंबई : सध्या मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. किराणा मालापासून ते गेम झोनपर्यंत सर्वच गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध होतात. यामुळे मॉल संस्कृती लोकांच्या पसंतीस पडत आहे. यामध्ये मॉलमध्ये जाऊन गेम झोनमध्ये खेळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मॉलमध्ये पैसे भरुन गेम झोनमध्ये जाणे लोकांना प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. मात्र या गेमझोनमध्ये अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक घटना मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये घडली आहे. बाऊन्स गेम खेळताना ट्रेम्पोलिनची स्प्रिंग तुटल्याने तरुण खाली पडल्याची घटना घडली. यात तरुणाच्या पाय मोडला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात गेमझोन व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
घाटकोपरमधील रहिवासी असलेला तीर्थ कांजी बेरा हा तरुण मित्रांसोबत मालाड येथील इन्फिनिटी मॉलमध्ये 18 जून रोजी गेमझोनमध्ये खेळायला गेला होता. गेमझोनमध्ये तो बाऊन्सिंग गेम खेळायला गेला. बाऊन्स ट्रॅम्पोलिनवर उडी घेताच ट्रॅम्पोलिनची स्प्रिंग तुटली आणि तरुण खाली पडली. यात तरुणाचा पाय मोडला. तरुणाला कुर्ल्यातील क्रिटी केअर एशिया मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेमझोन व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या दुर्घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. तीर्थच्या उजव्या पायाला गुडघ्याखाली फ्रॅक्चर झाले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी गेम झोनच्या व्यवस्थापकाविरुद्ध भादंवि कलम 336, 338 अन्वये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.