शॅम्पेनचे झाकण उघडण्यावरुन वाद, क्लब कर्मचारी आणि ग्राहक भिडले !
काही तरुण क्लबमध्ये पार्टी करायला गेले होते. तेथे क्षुल्लक वादातून त्यांचा क्लबमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. या वाद विकोपाला गेला.
मुंबई : शॅम्पेनचे झाकण उघडण्यावरुन झालेल्या क्षुल्लक कारणातून क्लबमधील कर्मचारी आणि ग्राहकामध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्र्यातील इस्को क्लबमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. क्लबमधील बाऊन्सर्स ग्राहकांना मारहाण करताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओत बाऊन्सर ग्राहकांना मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मारहाण प्रकरणी सात जणांना अटक
काही तरुण वांद्रे येथील इस्को क्लबमध्ये काल मध्यरात्री एक वाजता गेले होते. तेथे शॅम्पेनचे झाकण उघडण्यावरुन त्यांचा क्लबमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. क्लबमधील बाऊन्सर्सने ग्राहकांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती वांद्रे पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्राहकांची सुटका केली. यानंतर एका तरुणाच्या फिर्यादीवरुन वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवत सात जणांना अटक केली, असे मुंबई पोलीस झोन 9 चे सीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातही तुफान हाणामारी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातही हाणामारी घटना गुरुवारी घडली. जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या पाचव्या मजल्यावर हा प्रकार घडला. वकिल तरुणाकडून शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. राजेंद्र दिनकर चव्हाण असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. विरोधी पक्षकाराच्या वकिलाने दमदाटी केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. तर स्वसंरक्षणासाठी मारहाण केल्याचा वकिलाचा दावा आहे.