दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद
कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका शेतातील घरावर रात्रीच्या वेळी आठ ते दहा जणांनी अचानक हल्ला केला. हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
नागपूर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामठी पोलीस स्टेशनच्या (Kamathi Police Station) हद्दीत असलेल्या एका शेतातील घरावर रात्रीच्या वेळी आठ ते दहा जणांनी अचानक हल्ला(Attack) केला. हा हल्ला दरोड्याच्या (Robbery) उद्देशाने करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींनी यावेळी फायरिंग करत दहशत माजवली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर -जबलपूर हायवेवर यशपाल शर्मा यांचे शेतात घर आहे. त्यांच्या शेतातील घरावर हा हल्ला करण्यात आला. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. मात्र दरोड्याचा प्रयत्न फसल्याने संबंधित आरोपींनी घटनास्थळावरू पळ काढला.
दगडफेक देखील केली
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर जबलपूर हायवे वर यशपाल शर्मा यांचे शेत आहे. हे शेत आवंडी गावापासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावर आहे. या शेतात शर्मा यांचे एकटेच घर आहे. शेताच्या आसपास काही अंतरावर मजुरांची घरे आहेत. रात्रीच्या सुमारास आठ ते दहा जणांनी शर्मा यांच्या घरावर हल्ला केला. हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी आरोपींनी फायरिंग देखील केली. फायरिंगचा आवाज ऐकूण शेतात काम करणारे मजूर बाहेर आले, मात्र समोरचे दृष्य बघून ते परत घरात गेले. आरोपींनी फायरिंग करत दगडफेक देखील केली. मात्र घारत शिरण्यात अपयश आल्याने हल्लेखोर पुन्हा परतले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध
दरम्यान आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत. शेतात एकटेच घर असल्याचे पाहून आरोपींनी घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयश्वस्वी झाल्याने त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.