…आणि चार मित्र पुराच्या चक्रव्यूव्हात अडकले, जल्लोषाचं संकटात रुपांतर, गोंदियातील मन पिळवटून टाकणारी घटना
मारबत मिरवणूक नदीवर घेऊन गेल्यानंतर आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना आमगाव तालुक्यात ग्राम मुंडीपार येथे घडली आहे.
गोंदिया : गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये बैल पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढण्याची एक परंपरा आहे. अशीच एक मारबत मिरवणूक नदीवर घेऊन गेल्यानंतर आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना आमगाव तालुक्यात ग्राम मुंडीपार येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घरातील तरुण मुलांच्या निधनामुळे चारही मृतकांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित घटना ही मंगळवारी (7 सप्टेंबर) सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत मयूर अशोक खोब्रागडे (20), सुमित दिलीप शेंडे (17), संतोष अशोक बहेकार (19) आणि बंडू किशोर बहेकार (16) यांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभर नदीपात्रात त्यांचा शोध सुरु होता. अखेर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास चौघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. यावेळी नदी काठावर गावकऱ्यांची मोठी गर्दी जमलेली होती. तसेच मृतकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.
नेमकं काय घडलं?
इंग्रजांच्या काळात बाकांबाई हिने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे तिचा निषेध म्हणून नागपूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढण्याची प्रथा आहे. ही खूप मोठी मिरवणूक असते. या मिरवणुकीला यात्रेचं देखील स्वरुप आलेलं असतं. अशीच मारबत मंगळवारी ग्राम मुंडीपार येथून निघाली होती. ही मारबत शिवारात सोडण्यात आली.
मारबतमध्ये 100 पेक्षा जास्त मुलं सहभागी
या मारबतमध्ये जवळपास 100 पेक्षाही जास्त मुलं सहभागी झाले होते. मारबतची मिरवणूक संपल्यानंतर अनेक तरुण हे वाघ नदीजवळ आंघोळीसाठी गेले. मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास या सगळ्या घडामोडी घडत होत्या. या दरम्यान विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक तरुणांनी नदीपात्रातून बाहेर निघत घरचा रस्ता धरला.
चार मित्र वाहून गेले
पावसामुळे सर्वच मुलं नदीपात्रातून बाहेर पडत होती. पण नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने मयूर खोब्रागडे, सुमित शेंडे, संतोष बहेकार आणि बंडू बहेकार हे चार मित्र पुराच्या चक्रव्यूव्हात अडकले. पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे त्यांना नदीबाहेर येता आलं नाही. ते नदीच्या पाण्यात वाहून गेले.
या दरम्यान मृतक चार तरुण नदीतून बाहेर आली नाहीत, ते नदीच्या प्रवाहात वाहून गेली अशी माहिती संपूर्ण गावात पसरली. पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाचे कर्मचारी, पोलीस, मच्छीमार यांनी मृतक तरुणांचा शोध सुरु केला. मात्र, ते सापडत नव्हते. काल दिवसभर त्यांचा नदीपात्रात शोध सुरु होता. रात्री उशिरा ही शोध मोहिम थांबवण्यात आली होती. पण मुलांचा पत्ताच लागत नव्हता. अखेर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास चारही मित्रांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. चौघांचे मृतदेह आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा :
स्वयंपाक्याकडून विश्वासघात, महिला IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
प्रेयसीचा साखरपुडा, लॉजमध्ये बोलावून प्रियकराकडून चाकूचे वार, नंतर रेल्वेखाली उडी