नागपुरात शिक्षण विभागाला फसवणारा मोठा घोटाळा, 19 पालकांवर गुन्हे दाखल, मुख्य आरोपी फरार
नागपुरात शिक्षण विभागाला फसवणारा मोठा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी वेगवान तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 19 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नागपुरात झालेल्या आरटीई घोटाळ्यातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ अजून फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात कागदपत्र आणि एक तलवार सापडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 19 पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. 2 पालकांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी हा काही काळापूर्वी शासनाच्या समितीवर होता. त्याने शासनाची फसवणूक केली आहे. त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. बनावट कागदपत्रे कोणी बनवले? कसे बनवले? याची चौकशी सुरू आहे.
आरटीई (राईट टू एज्युकेशन) म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नागपुरातील विविध शाळेत बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवणारे पालक आणि दलाल नागपूर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश शाळेत मिळवणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्राधान्य क्रमानुसार ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश दिला जातो. या शाळा उपलब्ध नसल्यास खासगी शाळेत प्रवेश घेता येतो. मात्र,काही पालकांनी दलालांच्या मदतीने बोगस कागदपत्रांच्या आधारे नामांकित शाळेत प्रवेश मिळवला.
शिक्षण विभागाने संशयाच्या आधारे तपास केला तेव्हा 17 पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचं उघड झाले. त्यानंतर शिक्षण विभागाने सर्व संबंधित मुलाचा प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असून 19 पालकांविरोधात कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.