मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरची उभ्या आयशरला धडक; एका चालकाचा मृत्यू, एक जखमी
मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एक तर चालक अतिवेगात वाहने चालवतात किंवा अनेकांनी मद्यप्राशन केलेले असते. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि असे अपघात होतायत.
शैलेश पुरोहित, इगतपुरीः मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गावर (highway) कंटेनरने (Mh. 43 E. 5930) उभ्या आयशरला (Mh. 15 HH. 8222) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आयशर चालकाचा (driver) जागीच मृत्यू झाला. अशोक निवृत्ती सांगळे (वय 45) असे मृताचे नाव आहे. ते सिन्नर तालुक्यातले चाचड गावचे रहिवासी होते. तर कंटेनर चालक अरविंद यादव (रा. जोनपूर, उत्तर प्रदेश) हा जखमी झाला आहे. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एक तर चालक अतिवेगात वाहने चालवतात किंवा अनेकांनी मद्यप्राशन केलेले असते. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि असे अपघात होतायत.
नाशिकमध्येही अपघात वाढले
नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते.
हेल्मटसक्ती सापडली वादात
नाशिकमधील अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यांची परीक्षाही घेण्यात आली. त्यानंतरही दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत. आता सध्या पोलीस आयुक्तांनी पुन्हा एकदा नो हेल्मेट-नो पट्रोल, धोरण लागू करण्याची मागणी पेट्रोलपंप चालकांकडे केलीय. मात्र, पेट्रोलपंप चालकांनी त्याला विरोध केलाय.
वेगावर नियंत्रण हवे
कुठेही होणारे बहुतांश अपघात सहज टाळता येतात. मात्र, त्यासाठी चालकाने वेगावर नियंत्रण ठेवायला हवे. वेग मर्यादेत असेल, तर प्रवास सहज आणि सुकर होतो. शिवाय आपण कोणाच्या मृत्यूला वा जखमी होण्याला कारणीभूत होत नाही. त्यासाठी प्रत्येकाने सजग रहायला हवे. शक्य तितके अपघात टाळायला हवेत.