डोळ्यासमोरच ज्वाळा भडकल्या… सख्ख्या भावानेच भावाला जिवंत जाळलं; कारण ऐकून धक्काच बसेल
नाशिकमध्ये भयानक घटना घडली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या दोन मुलांना हाताशी घेत भावाची हत्या केली आहे. आरोपींनी वृद्धावर डिझेल टाकत पेटवून दिलं. वृद्ध जीव वाचवण्यासाठी प्रचंड आक्रोश करत होता. या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झालाय.
नाशिक जिल्ह्यात सख्खा भाऊ पक्का वैरी ठरल्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळाला आहे. जमिनी आणि विहिरीच्या वादातून सख्खा भाऊ आणि दोन पुतण्यांनी वृद्धाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावात घडली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत वृद्ध कचेश्वर महादू नागरे हे 95 टक्के भाजल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा सुन्न झाला आहे. जमिनीसाठी वृद्धासोबत इतकं संतापजनक कृत्य करणाऱ्या आरोपींना कठोरता कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे.
निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथे नागरे बंधूमध्ये वडिलोपार्जित जमीन आणि विहिरीवरून वाद होता. या प्रकरणी 2022 मध्ये निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा वाद मिटलाच नव्हता. वयोवृद्ध कचेश्वर नागरे मंगळवारी सकाळी आपल्या शेतातील घरासमोर साफसफाई करत होते. यावेळी तिथे कचेश्वर यांचे धाकटे बंधू आणि दोन पुतण्यांनी संधी साधत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी हल्ला कसा केला?
आरोपींनी घराबाहेर कोणी नसल्याने संधी साधत कचेश्नर नागरे यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. काही समजायच्या आत कचेश्वर आग विझवण्यासाठी सैरभैर पळू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजाने घरातील कुटुंबीय घराबाहेर धाव घेत पळत आले. पाहता तर काय घरातील प्रमुख कचेश्वर हे आगीमध्ये जळत असल्याची घटना डोळ्यासमोर घडत होती. कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी आग विझवत कचेश्वर यांना निफाड येथील शासकीय रुग्णालयात नेलं.
निफाड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर कचेश्वर यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण कचेश्वर 95 टक्के आगीमध्ये भाजल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निफाड पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र कचेश्वर नागरे यांना जिवंत जाळून त्यांचे भाऊ आणि दोन्ही पुतणे हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.