कसारा घाटात दगडफेक करुन गाड्या अडवायचे, चाकू-पिस्तूलचा दाख दाखवत लुटमार, अखेर…
कसारा घाटात सर्वसामान्य नागरिकांची वाहनं थांबवून लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळे या टोळीतील इतर आरोपींना पोलीस लवकरच शोधून काढण्याची शक्यता आहे. कसारा घाट हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाट लागतो. या मार्गाने दररोज लाखो वाहनं जातात. अशा महत्त्वाच्या मार्गावर लुटमारीच्या घटना समोर आल्याने प्रवाशांमध्येही धडकी भरली आहे. पण पोलीस आता लुटमार करणाऱ्या टोळीचाच बरोबर पंचनामा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक | 9 नोव्हेंबर 2023 : कसारा घाटातून दररोज लाखो गाड्या ये-जा करतात. दररोज मुंबई-नाशिक असं अपडाऊन करणारे नागरीक येथून ये-जा करतात. तसेच हा मार्ग आग्र्याला जातो. मुंबईहून अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये इतून वाहतूक होते. अनेक कुटुंब आपापल्या खासगी गाडीने इथून ये-जा करतात. पण या कसारा घाटात गेल्या तीन-चार दिवसांपासून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आरोपी दगडफेक करुन किंवा इतर क्लृपत्या वापरुन वाहनं अडवायचे. ते चाकू आणि पिस्तूलीचा धाक दाखवून वाहनातील नागरिकांचे पैसे, दागिने आणि इतर ऐवज लुटून न्यायचे. अखेर या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
कसारा घाटात गेल्या तीन-चार दिवसांपासून वाहनांना अडवून लूटमार करणाऱ्या टोळीपैकी दोन जणांना कसारा पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. कसारा घाटत गेल्या-तीन चार दिवसांपासून नवीन आणि जुन्या कसारा घाटातील मार्गांवर वाहनांना अडवून या टोळीकडून लुटमार केली जात होती. कसारा घाटात बंद पडलेली गाडी दिसली की या टोळीच्या हाती आयतं कोलीत सापडायचं. तसेच ही टोळी रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडफेक करुन वाहने थांबयची. त्यानंतर चाकू आणि पिस्तूलीचा धाक दाखवून चालकांकडून पैसे, गाडीतील सामान चोरी करून पसार व्हायची.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?
कसारा घाटात जव्हार फाट्यावर गुरुवारी (9 नोव्हेंबर) पहाटे जुन्या एक वाहन बंद पडलं होतं. याचाच फायदा घेत आरोपींनी चाकू आणि पिस्तूलीचा धाक दाखवत लुटमार केली. चोरटे पैसे आणि वाहनातील सामान घेऊन पसार झाले. पीडित वाहन चालकाने जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेत तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहनचालकाने कशीतरी पोलीस चौकी गाठली. वाहनचालकाने कसारा पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली.
कसारा पोलीस संबंधित घटनेची माहिती मिळताच तात्काळ जुन्या कसारा घाटात घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलीस घटात असतानाच नवीन कसारा घाटत वाहनांवर दगडी फेकून आडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा नवीन कसारा घाटाच्या दिशेला वळवला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी रोहन सुनिल सोनवणे (राहणार : इगतपुरी, तळेगाव), महेश लहानू बिन्नर (राहणार : लतीफवाडी, शहापूर) यांना जेरबंद केलं. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.