Nashik Crime | एकतर्फी प्रेम, तिला लग्नासाठी मागणी घातली, तिने नकार देताच त्याचं भयानक कृत्य
नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून नको ते संतापजनक कृत्य केलं आहे. त्याच्या कृत्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कृत्यामुळे लाखो रुपयांचं देखील नुकसान झालं आहे. नाशिकमधील अनेकांनी त्याच्या अशाप्रकारच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.
चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक | 16 नोव्हेंबर 2023 : प्रेम ही खूप सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडणं, समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची जाणीव करुन देणं, समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमात पाडणं या गोष्टी फार मजेशीर आहेत. विशेष म्हणजे प्रेमात एक आदर असतो. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे त्या व्यक्तीचा पूर्णपणे स्वीकार करणं, त्या व्यक्तीला समजून घेणं, त्या व्यक्तीला हवं तसं वागणं, त्या व्यक्तीचा आदर राखणं, त्या व्यक्तीच्या सुखासाठी झटणं. पण काही माणसं बिभत्स असतात. त्यांना प्रेम ही भावनाच समजत नाही. एखादी व्यक्ती आपल्याला आवडली तर त्या व्यक्तीलादेखील आपण आवडू, असं काही माणसं समजतात. त्यातून ते नको ते विकृत कृत्य करतात. समोरच्यावर जबरदस्ती करतात. आपल्या भावना त्या व्यक्तीवर जबरदस्ती बिंबवण्याचा प्रयत्न करतात. समोरच्याने त्या भावना स्वीकारल्या नाहीत तर त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी अशी विकृत माणसं काहीही कृत्य करायला तयार होता. नाशिकमध्ये असाच काहीसा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या साथीदारासह तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ही घटना उघडकीस आलीय. यात फिर्यादी तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेत वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केली.
या घटनेतील फिर्यादी तरुणी आणि संशयित सुमित पगारे यांची ओळख आहे. संशयित पगारे याने फिर्यादी तरुणीला सातत्याने विवाह करण्याचा तगादा लावला. तरुणीने यास नकार दिल्याने संशयित पगारे यास राग आला. त्याने सहकारी संशयित विकी जावरे (रा. काठेगल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षाची जाळपोळ केली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून खाक झाली होती. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय.