दसऱ्याच्या दिवशी लेकीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारच्या धडकेत मृत्यू; दुचाकी जळून खाक, मेहुणा गंभीर
दसऱ्याच्या दिवशी मुलीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. रंगनाथ खालकर असे मृताचे नाव आहे, तर त्यांच्या गंभीर जखमी मेहुण्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिकः दसऱ्याच्या दिवशी मुलीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारने दिलेल्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. रंगनाथ खालकर असे मृताचे नाव आहे, तर त्यांच्या गंभीर जखमी मेहुण्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगणवेढे परिसरात ही घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महादू काळू टिळे (वय 55, रा. दारणा सांगवी) आणि रंगनाथ मुरलीधर खालकर (वय 62, रा. नागापूर, चांदोरीजवळ, ता. निफाड) हे दुचाकीवरून आज शुक्रवारी दसऱ्यादिवशी मुलीला तिच्या सासरी भेटायला गेले होते. खालकर यांनी आपल्या मुलीची भेट घेतली आणि ते गावी निघाले. त्यांची दुचाकी (एम.एच. 15 एफ.जी. 3711) हिंगणवेढे येथून जात होती. त्यांच्या समोरून एक कार येत होती. कार कोटमगावडे जात होती. या कार (एम. एच. 15 ए. एच. 4175) चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. स्पार्किंगमुळे दुचाकीने पेट घेतला. ती जागीच जळून खाक झाली. दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी खालकर यांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी टिळे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालकाने पलायन केले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे करत आहेत.
उड्डाणपुलावर उडवले
नाशिकमध्ये द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर घडली. यात घटनेत एका ट्रकने धडक दिल्यामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत झालेला तरुण अविनाश राजेंद्र सूर्यवंशी हा जळगाव जिल्ह्यातल्या गलवाडा येथील होता. सध्या तो सिडकोतल्या दत्त चौकात रहायचा. याबाबत माहिती अशी की, अविनाश हा द्वारका सर्कलकडून दुचाकीवर (एम. एच. 15 डीजी 2239) उड्डाणपुलावरून सिडकोकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम.पी. 09 एच.एच.8267) त्याच्या दुचाकीला उडवले. या घटनेत अविनाश जबर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरून पडल्याने मृत्यू
नाशिकमध्ये दुचाकीवरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश कारभारी शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीत झाली. याबाबतची माहिती अशी की, महेश शिंदे हे एमआडीसीतून श्रमिकनगरकडे चालला होता. मात्र, अचानक धावत्या दुचाकीवरून ते रस्त्यावर पडले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे हे करत आहेत.
इतर बातम्याः
मान्सूनची माघार, पण उत्तर महाराष्ट्रात अजून दोन दिवस बॅटींग करणार!https://t.co/hAaPU8mJ2e#Nashik|#NorthMaharashtra|#Rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021