सामसूम रस्ता बघून महिलेला हेरलं, गाडी थांबवली, चाकू दाखवत दमदाटी, दागिने हिसकावले, पोलिसांनी आरोपीला बरोबर घेरलं
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. पारनेरच्या म्हसे गावातील सुमिता जाधव यांना घरी पायी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून लुबाडले होते.
अहमदनगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेस हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. पारनेरच्या म्हसे गावातील सुमिता जाधव यांना घरी पायी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून लुबाडले होते. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफूले आणि दोन मोबाईल असा एकूण 19 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांना आरोपी अरुण म्हेत्रेच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररदार महिला 6 ऑगस्ट रोजी पारनेर तालुक्यातील मसदपूर्द या गावातून जाधववाडी या दिशेला जात होत्या. त्यावेळी वाटेवर सामसूम रत्याचा फायदा घेऊन बाईकने आलेल्या एका इसमाने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल, कर्णफुल असा ऐवज जबरीने चोरुन नेला होता.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
या प्रकरणाचा तपास करत असताना जामखेड तालुक्यातील सदाफुले येथे राहणारा किरण म्हेत्रे यानेच ते कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घरी जावून त्याला ताब्यात घेतलं. आरोपीने पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. पण त्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपी सराईत चोर
संबंधित आरोपी हा सराईत चोर आहे. त्याच्यावर लातूरच्या रेणापूर, बारामती, पनवेल, कल्याण अशा ठिकाणी दरोडे, दरोड्याच्यी तयारी अशाप्रकारचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.