कल्याणच्या घटनेनंतर डोंबिवलीतील पोलीस कुटुंब भयभीत; ‘आमच्या मुलींसोबत हे होऊ नये’
डोंबिवलीत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या 9 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा आणि नंतर झालेल्या मारहाणीचा संदर्भ देत, पीडित कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. आरोपीने मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनाही मारहाण केली. या पीडित कुटुंबियांची कल्याण कोळशेवाडीतील अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनेमुळे भीती वाढली आहे. पीडितेच्या आईने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पोलीस कुटुंबातील 9 वर्ष अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी जाब विचारल्याने संतप्त झालेल्या उत्तम पांडे नावाच्या कुटुंबियाने त्या पोलीस कर्मचारी आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता कल्याण कोळशेवाडी परिसरात एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या प्रकारानंतर या पोलीस कुटुंबाच्या मनात देखील भीती निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस कुटुंब आता न्यायाची अपेक्षा करत आहे.
या घटनेतील पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीसोबत घडलेली घटना सांगत न्यायाची मागणी केली. “माझी मुलगी पहिल्या माळ्यावर खेळत असताना उत्तम पांडेने तिला घरी नेऊन अनुचित प्रकार केला. नको त्या ठिकाणी बळजबरीने स्पर्श केला. मुलीच्या मैत्रिणीकडून प्रकार समजल्यावर कुटुंबीयांनी आरोपीला विचारायला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला केला. आई, पती आणि मलाही मारहाण केली. मात्र आमच्यावर विनाकारण गुन्हा दाखल केला”, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
पीडितेची आई नेमकं काय-काय म्हणाली?
“सीसीटीव्ही फुटेज तपासा, माझ्या पतीने कोणालाही हात लावलेला नाही. मला मारहाण केली म्हणून मी तिला मारहाण केली. कल्याण पूर्वेत जी घटना घडली तसं आमच्या मुलीसोबत काही होऊ नये म्हणून आम्हाला न्याय हवा. कल्याण पूर्वेत जो विशाल गवळी याने केलं, त्याच्यावर वेळेवरती कठोर कारवाई झाली असती, तर हा प्रकार टाळता आला असता. आमच्या सोसायटीत महिला आणि लहान मुली आहेत. तो सुटून आला, तर पुन्हा अशा घटना घडतील”, असं पीडितेची आई म्हणाली.
“आम्ही भीतीच्या वातावरणात राहत आहोत. त्याला अटक झाली पाहिजे. पहिल्यांदा आवाज उचलला तरच न्याय मिळतो. वेळेत कारवाई झाली असती, तर हा गुन्हा पुन्हा घडला नसता. आता पोलीस कुटुंबच सुरक्षित नाही, मग सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार? माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला अटक झाली पाहिजे”, अशी मागणी पीडितेच्या आईने केली.