Pune Ganja Seized : पिंपरी चिंचवडमध्ये 24 किलो 118 ग्रॅम गांजा जप्त, तीन आरोपी अटक
वाकड पोलिसांचे पथक सम्राट चौक वाकड येथे पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना रोडलगत एका पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमध्ये तीन जण संशयित हालचाली करीत असल्याचे दिसले. ते तिघेही कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहत होते. पोलिसांना पाहून हे तिघेही कारसह पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.
पिंपरी-चिंचवड : वाकड येथे पेट्रोलिंग (Patrolling) दरम्यान एका गाडीतून 24 किलो 118 ग्रॅम गांजा (Cannabis) जप्त केला आहे. एका टाटा इंडिका कारसह 6 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. श्रीकांत लिंबाजी राठोड (33), सुनील लालसिंग राठोड (31) आणि तानाजी दगडू पवार (42) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे असून तीनही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पेट्रोलिंग करत असताना वाकडमधील सम्राट चौकात पोलिसांना तिघांची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या गाडीत गांजा असल्याचे आढळले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम 8(क), 20(ब), (ii) (क) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबादहून विक्रीसाठी आणला होता गांजा
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाला तशा सूचना दिल्या. त्यानुसार वाकड पोलिसांचे पथक सम्राट चौक वाकड येथे पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना रोडलगत एका पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमध्ये तीन जण संशयित हालचाली करीत असल्याचे दिसले. ते तिघेही कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहत होते. पोलिसांना पाहून हे तिघेही कारसह पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी तात्काळ तेथे धाव त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. आरोपींच्या कारची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 24 किलो 118 ग्रॅम गांजा आढळून आला. याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता, हा माल हैदराबादहून विक्रीसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. (24 kg 118 gm cannabis seized in Pimpri Chinchwad, three accused arrested)