Baramati Murder : बारामतीत हॉटेलमधील किचनच्या वादातून आचाऱ्याची हत्या, एका तासात पोलिसांनी केली आरोपीला अटक
जळोची भागात गेल्या आठ दिवसांपूर्वी नव्याने सुरुवात झालेल्या मातोश्री हॉटेलमध्ये आरोपी विकास सिंग आणि मयत गणेश चव्हाण दोघेही आचाऱ्याचे काम करीत होते. आरोपी सिंग हा रोट्या बनवण्याचे काम करीत होता. तर मयत चव्हाण भाज्या बनवायचा.
बारामती : शाकाहारी किचनमध्ये येण्या-जाण्यावरून झालेला वाद (Dispute) एका आचाऱ्याच्या जीवावर बेतलाय. बारामती शहरानजीकच्या जळोची येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय आचाऱ्या (Chef)ने त्याच्या सहकाऱ्याची चाकूने वार करत हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बारामती पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, या घटनेतील मृत हॉटेल कर्मचारी हा नाशिक जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. गणेश प्रभाकर चव्हाण (रा. मालेगाव जिल्हा नाशिक) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विकास दीपक सिंग (29) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ वादातून हत्या
जळोची भागात गेल्या आठ दिवसांपूर्वी नव्याने सुरुवात झालेल्या मातोश्री हॉटेलमध्ये आरोपी विकास सिंग आणि मयत गणेश चव्हाण दोघेही आचाऱ्याचे काम करीत होते. आरोपी सिंग हा रोट्या बनवण्याचे काम करीत होता. तर मयत चव्हाण भाज्या बनवायचा. गुरुवारी रात्री आरोपी सिंग आणि गणेश चव्हाण यांच्यात तू नॉनव्हेज बनवतोस तर माझ्या किचनमध्ये पाय ठेवू नकोस यावरून वाद झाला. किरकोळ वादाचे पर्यावसन भांडणात झाले. हॉटेल मालकाच्या मध्यस्थीने हा वाद सोडवला मात्र शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सिंग याने चव्हाण याच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला. दरम्यान, घटनेनंतर आरोपी विकास सिंग हा पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असताना बारामती तालुका पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेतील मयत गणेश चव्हाण हा नाशिक जिल्ह्यातून तडीपार असून विविध गुन्ह्यात त्याचा समावेश आहे. तो नाव बदलून बारामतीत काम करीत होता. त्याच्या हत्येनंतर अधिक चौकशी केल्यानंतर तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.