धक्कादायक! पुणे बनलं बांगलादेशी घुसखोरांचं हब? पॅन, आधारकार्ड खरेदी करत घुसखोरांचं अनेक वर्ष वास्तव्य
शिक्षण आणि आयटीचं माहेरघरं असणारं पुणे (Pune) बांगलादेशी घुसखोरांचं (Bangladeshi Infiltrators) हब बनलं आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. कारण, पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही बांगलादेशी घुसखोर भारतीय नागरिक असल्याचं भासवून वास्तव्य करत असल्याचं उघड झालं आहे.
पुणे : शिक्षण आणि आयटीचं माहेरघरं असणारं पुणे (Pune) बांगलादेशी घुसखोरांचं (Bangladeshi Infiltrators) हब बनलं आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. कारण, पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही बांगलादेशी घुसखोर भारतीय नागरिक असल्याचं भासवून वास्तव्य करत असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे भारतात वास्तव्य करण्यासाठी या घुसखोरांनी बनावट पॅनकार्ड (Pan Card) आणि आधारकार्डही (Aadhar Card) खरेदी केलं आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. (Bangladeshi infiltrators have been living in Pune for many years)
बांगलादेशी घुसखोर हडपसर भागात वास्तव्यास
केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या (Central Intelligence Agency) माहितीच्या आधारावर बेकायदेशीरपणे भारतात स्थलांतरित झालेल्या सात व्यक्तींची नुकतीच पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. हे बांगलादेशी घुसखोर पुण्याच्या हडपसर (Hadapsar) भागात वास्तव्यास आहेत. ही लोकं 1995 ते 2011 दरम्यान बांगलादेशमधून भारतात आल्याचं सांगितलं जात आहे.
या संशयितांचं बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणतीही कागदपत्रे जप्त करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
भारतात आल्यानंतर खरेदी केली बनावट कागदपत्रे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलावर मंडल, एसए शेख, फारुख शेख, एनआर शेख, कामरुल मंडल, मुनीर शेख, हुमायूं शेख अशी या संशयित बांगलादेशींची नावं आहेत. हे 1995, 2002, 2007, 2008, आणि 2011 मध्ये कोलकाता मार्गे भारतात आले आणि त्यानंतर पुण्यात पोहोचले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड अशी भारतीय कागदपत्रे खरेदी केल्याचेही पोलीस चौकशीत समोर आलं आहे. सध्या हे संशयित मंतरवाडी कचरा डेपोमध्ये रॅग पिकर्स म्हणून काम करत आहेत.
बांगलादेशी सिद्ध झाल्यानंतर कारवाई
चौकशीत आपण बांगलादेशातून आलो असल्याचं संशयितांनी सांगितलं असलं तरी त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्र जप्त करण्यात आलेली नाहीत. अशी कागदपत्र आढळून आल्यानंतर पोलिसांकडून पुढची कारवाई केली जाणार आहे. सध्या या संशयित बांगलादेशींना हडपसर भागातले वकील अस्लम सय्यद यांच्याकडे सोडण्यात आलं आहे. पोलीस चौकशीसाठी आवश्यकता असेल तेव्हा संशयितांना सादर करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
एका संशयिताने पुण्यात खरेदी केली जमीन
संशयित बांगलादेशी हे अनेक वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. यापैकी अनेकांची इथेच लग्न झाली आहेत. त्यांना मुलंबाळ देखील आहेत. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांनी आपल्याकडची कागदपत्रं सादर केली. यामध्ये आधार, पॅनकार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र, मुलांच्या जन्माचा दाखला अशी कागदपत्रं आहेत. विशेष म्हणजे एका बांगलादेशी संशयिताने पुण्यात जमीनही खरेदी केली आहे. त्याची कागदपत्रही पोलिसांकडे सादर केली आहेत. पोलिसांकडून या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
इतर बातम्या :