पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी आंतरराष्ट्रीय कॉल, 25 लाख द्या, अन्यथा…
BJP leader Ganesh Bidkar extortion call: भाजप नेते गणेश बिडकर यांना दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. यापूर्वी मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांना खंडणीसाठी फोन आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअॅपवर फोन करण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असताना पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आला आहे. धमकीचा हा फोन आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आला आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडल्यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. गणेश बिडकर यांना मिळालेली ही दुसरी धमकी आहे. यापूर्वी मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांना धमकी मिळाली होती.
आता काय मिळाली धमकी
भाजप नेते गणेश बिडकर यांना रविवारी रात्री आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला आहे. फोन करणाऱ्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 25 लाख रुपये न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करु, तुमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आली. यानंतर गणेश बिडकर यांनी पुणे पोलिसांच्या लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आला आहे.
गणेश बिडकर यांना यापूर्वी धमकी
गणेश बिडकर यांना दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. यापूर्वी मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांना खंडणीसाठी फोन आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअॅपवर फोन करण्यात आला होता. त्यावेळी 25 लाखाची खंडणी मागितली गेली होती. पुन्हा त्याच व्यक्तीचा फोन आहे की दुसरा कोणी आहे, याचाही तपास पुणे पोलीस करत आहे.
पुण्यातील नेत्यांना यापूर्वी धमकी
पुणे शहरातील राजकीय नेत्यांना धमकी देण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, सध्या वंचित आघाडीत असलेले लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी दिली गेली होती. या धमकी प्रकरणात इम्रान शेख या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.