पुणे शहरात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांबाबत मिळाली महत्वाची माहिती, काय होता त्यांचा प्लॅन?
Pune Crime News : पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. या दोघ दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस होते. त्याची एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यातून महत्वाची माहिती मिळाली आहे.
योगेश बोरसे, पुणे | 27 जुलै 2023 : पुणे शहरात दीड वर्षांपासून राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणाशी आहे. या दोघांना राष्ट्रीय तपास संस्था शोधत होती. त्यांच्यावर एनआयएने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांचा समावेश मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासंदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी महत्वाची माहिती दिली.
त्या दोघांचा “जयपूर मॉड्यूलशी” कनेक्शन
पुण्यात अटक केलेल्या याकूब साकी आणि आणि इम्रान खान या दहशतवाद्यांचे “जयपूर मॉड्यूलशी” कनेक्शन आहे. त्यांच्यासंदर्भात एटीएसच्या चौकशीत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. तसेच दोन दिवसांत महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरात १८ जुलैला दोघं दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांचा राजस्थानच्या जयपूर मॉड्यूलशी कनेक्शनसमोर आले आहे. या सर्व लिंक जोडून दहशतवाद्यांचे मॉड्यूल उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सदानंद दाते यांनी सांगितले.
काय आहे कनेक्शन
राजस्थानच्या निंबाहेरामधील इम्रान खान याच्या फार्म हाऊसमधून झुबेर, अल्तमास आणि सैफुल्ला हे तिघे दहशतवादी मार्च २०२२ रोजी स्फोटक सामग्री घेऊन जयपूरला निघाले होते. या तिघांना राजस्थान ‘एटीएस’च्या पथकाने अटक केली होती. यावेळी मास्टरमाइंड इम्रान पसार झाला होता. आता राजस्थान आणि मध्यप्रदेश ‘एटीएस’सह महाराष्ट्र ’एटीएस’चे पथकांकडून इम्रान खान आणि याकूबची चौकशी सुरु आहे. एनआयएसुद्धा त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते.
काय मिळाले महत्वाचे अपडेट
पुणे शहरात घातपात घडवण्याबाबत त्यांचा कट असल्याची कोणतीही माहिती तपासात मिळाली नाही. परंतु या दोघांना हाताळणाऱ्या सूत्रधारांबाबत (हँडलर्स) महत्वाची माहिती एटीएसला मिळाली आहे, असे एटीएसचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले. ही माहिती संवेदनशील असल्याने अधिक काही बोलता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.