Lalti Patil | ललित पाटील प्रकरणात उद्योगपतीस अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Lalti Patil Crime News | पुणे शहरात उघड झालेल्या ललित पाटील याच्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. या प्रकरणात ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरुन एका उद्योगपतीस अटक करण्यात आली आहे.
पुणे | 26 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील तीन शहरांमधील पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ललित पाटील याचे ड्रग्स प्रकरण उघड केले होते. त्यानंतर ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाला होता. तब्बल पंधरा दिवसानंतर त्याला मुंबई पोलिसांनी कर्नाटकात अटक केली. त्याच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या पंधरापेक्षा जास्त झाली आहे. आता या प्रकरणात एका उद्योगपतीस अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याला मदत केल्याच्या प्रकरणात ही अटक झाली आहे.
कोणास झाली अटक
उद्योगपती आणि रोजरी एजुकेशन ग्रुपचे संचालक विनय आरान्हा याला अटक करण्यात आली आहे. विनय आरान्हा याच्यावर ललित पाटील याला मदत केल्याचा आरोप आहे. विनय आरान्हा याला अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) अटक केली होती. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. ससून रुग्णालयातच त्यांची ओळख ललित पाटील याच्याशी झाली होती. आता बुधवारी पुणे पोलिसांनी रुग्णालयातून त्याला अटक केली होती.
काय आहेत आरोप
ललित पाटील आणि विनय आरन्हा यांची ओळख ससून रुग्णालयातून वार्ड क्रमांक 16 मध्ये झाली होती. ललित पाटील याला त्यांनी मदत केली. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर रिक्षेने सोमवारी पेठेत गेला होता. त्यानंतर त्याला आरन्हा याचा वाहनचालक दत्ता डोके याने मदत केली. विनय आरन्हा याच्या सांगण्यावरुन डोके याने ललित पाटील याला रावेत या गावापर्यंत सोडले. तसेच दहा हजार रुपये दिले. ते पैसे घेऊन ललित पाटील मुंबईत आणि त्यानंतर नाशिकमध्ये आला.
ईडीने का केली होती अटक
ईडीने 10 मार्च रोजी विनय आरन्हा (वय 48) याला अटक केली होती. पुणे येथील कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून घेतलेले कर्ज बुडवल्याप्रकरणी ही अटक केली होती. आरन्हा यांनी 20 कोटी रुपयांहून अधिक कर्ज बँकेकडून घेतले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीखाली ही अटक झाली होती.