Lalit Patil | ललित पाटील याचा ससूनमध्ये उपचार नावाला, हॉटेलमध्ये होती रूम बुक
Pune crime Lalit Patil News | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात असताना ललित पाटील याची हॉटेलमधील रुम बुक होती. त्याला कोण कोण भेटत होते...
अभिजित पोते, पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पोलिसांकडून आता धक्कादायक माहिती मिळत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात केवळ नावालाच होता. त्याच्या नावावर अनेकवेळा हॉटेलमध्ये रुम बुक होती. तसेच रुग्णालयात आणि हॉटेलमध्ये त्याला कोण, कोण भेटण्यास येत होते, याची माहिती पोलिसांनी दिली. ड्रग्समधून मिळालेल्या पैशांतून ललित पाटील याने तब्बल आठ किलो सोनेही घेतल्याचे तपासातून समोर आले आहे. यामुळे हे प्रकरण तपासानंतर अधिकच गंभीर होणार आहे. दरम्यान या प्रकरणात रेहान शेख याचा ताबा मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे कोर्टात अर्ज केला आहे.
रुग्णालयात नावाला, हॉटेलमध्ये रुम
ललित पाटील हा कैदी होता. त्याच्यावर जून महिन्यापासून पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आठ दिवसांत बरे होणाऱ्या आजारांवर तो अनेक महिने रुग्णालयात राहिला. ससून रुग्णालयात त्याचे राहणे आरादायक होते. कैदी असताना त्याला सिगरेट मिळत होती. मैत्रिणी येत होत्या. हॉटेलमध्ये तो पाहिजे तेव्हा जात होता. भूषण पाटील, अभिषेक बलकवडे आणि प्रज्ञा कांबळे हे तिघेही अनेकदा ससून हॉस्पिटल आणि लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील याला भेटले असल्याचे तपासातून समोर आले आहे.
रुमचे पैसे कोण देत होता
ससून रुग्णालयात उपचार घेत असताना देखिल ललित पाटील याच्या नावावर लेमन ट्री हॉटेलमध्ये रूम बुकींग होती. त्या रूमचे पैसे एका अॅक्सिस बँकेच्या खात्यातून हॉटेलच्या खात्यात जमा होत होते. हे अॅक्सिस बँकेचे खात नेमके कुणाचे? या माहितीचा पोलीस तपास करत आहे. ललित पाटील आणि प्रज्ञा कांबळे या दोघांच्या नावावर लेमन ट्री हॉटेलमध्ये अनेकदा रूमचे बुकींग झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान ललित पाटील प्रकरणातील आरोपी रेहान शेख याला पुणे कोर्टात केले आहे. त्याचा ताबा पुणे पोलीस घेणार आहेत.
आठ किलो सोने घेतले
ललित पाटील याच्या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमधील सराफ व्यावसायिकांपर्यंत आले आहेत. ड्रग्सच्या पैशातून भूषण पाटील याने सोने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. भूषण पाटील याने नाशिकच्या सराफाकडून तब्बल 8 किलो सोने विकत घेतल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यातील 3 किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु उर्वरित सोने कुठे लपवले? याचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे.