मुलीच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी मृतदेह सापडला, बापाने जंगलात पुरला, पोलिसांनी दोन वर्षांनी उकरला
मुलीचा सांगाडा तिच्या वडिलांना मुलीच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी मिळाला होता. परंतु मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.
पिंपरी चिंचवड : दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा (Missing Minor Girl) मृतदेह सापडला. पुण्यातील घोडेगाव पोलिसांना तिचा मृतदेह शोधण्यात यश (Pune Crime) आले आहे. तहसीलदार रमा जोशी यांनी पंचनामा करुन तिचा मृतदेह बाहेर काढला. बेपत्ता मुलगी 17 वर्षांची होती. तिने आत्महत्या (Suicide) केली होती, मात्र मुलीचा सांगाडा वडिलांना तिच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी मिळाला. परंतु वडिलांनी कोणालाही माहिती न देता घोड नदीच्या लगत असलेल्या जंगलामध्ये पुरला होता. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी मागील सहा महिन्यापासून अपहरण झालेल्या किंवा बेपत्ता असलेल्या व्यक्ती, विशेषतः महिला आणि मुली यांच्या शोधाबाबत विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेदरम्यान आजपर्यंत एकूण 34 व्यक्तींना शोधण्यात घोडेगाव पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये 7 पुरुष, 14 महिला, एक मुलगा आणि 12 अल्पवयीन मुली यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
या मोहिमे दरम्यानच घोडेगाव पोलीस ठाण्यात कलम 363 अंतर्गत 4 फेब्रुवारी 2020 रोजी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, या गुन्ह्यातील अपहृत मुलगी (वय 17 वर्षे 7 महिने, रा. नाव्हेड पो. तिरपाड, ता. आंबेगाव, जि. पुणे) हिने आत्महत्या केली. मुलीचा सांगाडा तिच्या वडिलांना मुलीच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी मिळाला होता. परंतु मुलीच्या वडिलांनी (रा. नाव्हेड, पो. तिरपाड, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.
नातेवाईकांनी ठिकाण सांगितले
मिळालेल्या या माहितीच्या आधारे घोडेगाव पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलीचा सांगाडा घोड नदी लगत जंगलामध्ये पुरला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. ही माहिती तहसीलदार रमा जोशी यांना देऊन त्यांच्या उपस्थितीत या मुलीच्या हाडाचा सांगाडा शोधून काढण्यात आला आहे.
यावेळी श्रीमती. रमा जोशी – तहसिलदार आंबेगाव, श्री. जीवन माने – सहायक पोलिस निरीक्षक, श्री.अनिल चव्हाण – पोलीस उपनिरीक्षक, श्री.वाजे – सहायक फौजदार, श्री.लांडे – पोलीस नाईक, श्री.राहणे – पोलीस नाईक, श्री.रसाळ – पोलीस शिपाई, श्री.मुठे – पोलीस शिपाई, श्री.कानडे – होमगार्ड, श्री.पारधी – होमगार्ड, डॉ.चपटे – वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आडिवरे, डॉ. कांबळे – वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मंचर (फॉरेन्सिक एक्सपर्ट), डॉ. हांडे – वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मंचर यांच्या उपस्थितीत ही कामगिरी पार पाडण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. घोडेगाव पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की बेपत्ता असणाऱ्या नागरिकांच्या बाबत कोणाला काहीही माहिती असल्यास त्यांनी घोडेगाव पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
संबंधित बातम्या :
पुण्यात अनैतिक संबंधांतून घरमालकिणीची हत्या, दहा दिवसांनी भाडेकरुला बिहारमध्ये बेड्या
17 वर्षांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार, पुण्यात प्रसिद्ध बिल्डरवर गुन्हा
CCTV | हुडी घातला, मास्क लावला, तरी एटीएम फोडणारे पुण्यातले दोघे सापडलेच, नेमकं काय घडलं?