विनयभंगाच्या तक्रारीची धमकी, पुण्यातील नगरसेवकाकडे 15 लाखांच्या खंडणीची मागणी
एका महिलेला विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास सांगितले आणि त्यानंतर चाकणचा माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, सामाजिक कार्यकर्ते आणि एका पत्रकाराने संबंधित नगरसेवकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
पुणे : चाकणमधील नगरसेवक किशोर शेवकरी यांना विनयभंगाच्या तक्रारीची धमकी देत त्यांच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील चाकण पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
एका महिलेला विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास सांगितले आणि त्यानंतर चाकणचा माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, सामाजिक कार्यकर्ते आणि एका पत्रकाराने संबंधित नगरसेवकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीअंती बारा लाख रुपये किंवा पाच लाख रुपये सलोनी वैद्य हिच्या कॅन्सरच्या सर्जरीला खर्च करण्याची मागणी वेळोवेळी केली
नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉट्सअॅप चॅट तक्रारदाराने पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, कल्पेश भोईर, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, प्रणित, कुणाल राऊत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दोन आरोपींना चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील बिल्डरकडे खंडणीची मागणी, शेतकऱ्याला अटक
दुसरीकडे, एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांनी 46 वर्षीय शेतकरी आणि त्याच्या दोन मुलांना रविवारी अटक केली. तिघे आरोपी आपल्याला गेल्या पाच महिन्यांपासून त्रास देत असल्याचे बिल्डरने आपल्या तक्रारीत म्हटले होते. आपल्या दोन कंत्राटदारांकडून त्यांनी 75 हजार रुपये उकळल्याचा दावाही बिल्डरने केला होता.
संशयित सत्यवान तापकीर आणि त्यांची मुलं आकाश (25) आणि सागर (23) यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती दिघी पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
“तिघे आरोपी बांधकाम व्यावसायिकाला त्यांच्याकडूनच सर्व साहित्य खरेदी करण्यास भाग पाडत होते. जेव्हा तक्रारदाराने त्यांना नकार दिला, तेव्हा त्यांनी त्याच्या ठेकेदारांना धमकी दिली आणि त्यांच्याकडून 75,000 रुपये घेतले” असेही भदाणे म्हणाले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि त्याच्या वाहनांची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
ठाण्यात पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या
दरम्यान, पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या करुन त्याला घराजवळ पुरल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी खंडणीची मागणी केल्याचंही उघडकीस आलं आहे.
आरोपींनी हणमंत शेळके यांचं अपहरण केलं. त्याच दिवशी त्यांनी शेळके यांची अमानुषपणे हत्या केली. आरोपींनी शेळके यांचं मृत शरीर खोलीच्या मागेच चार फूट खोल खड्ड्यात मोकळ्या जागेत पुरलं. त्यानंतर शेळके यांच्याच मोबाईलवरुन फोन करत खंडणीची मागणी केली. घाबरेल्ल्या कुटुंबियांनी पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला.
हेही वाचा :
पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं
अमरावतीत पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7 वर्षीय चिमुकलीवर 20 वर्षीय युवकाचा बलात्कार
पुण्यातील बिल्डरकडे खंडणीची मागणी, शेतकऱ्यासह दोन मुलांना अटक