चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्येप्रकरणी पिंपरीत तरुणाला बेड्या
आरोपी राहुल प्रतापे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पत्नी गौरीच्या चारित्र्यावर तो सतत संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये वारंवार खटकेही उडायचे. मंगळवारी यातूनच त्याने पत्नीवर कोयत्याने हल्ला केला
पिंपरी चिंचवड : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोयत्याने वार करुन पती राहुल प्रतापे याने पत्नी गौरीला संपवलं. पिंपरी चिंचवड मधील पुनावळे भागात मंगळवारी रात्री ही घटना घडली. आरोपी पती हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात आहे.
कोयत्याने वार करुन हत्या
आरोपी राहुल प्रतापे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पत्नी गौरीच्या चारित्र्यावर तो सतत संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये वारंवार खटकेही उडायचे. मंगळवारी रात्रीही चारित्र्याच्या संशयावरुन राहुलने गौरी हिच्याशी भांडण केले. त्यानंतर चिडून तिच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या गौरीचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
आरोपी राहुल प्रतापे हा गेल्या दोन वर्षांपासून विजयनगर माळवाडी पुनावळे भागात वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह भाड्याच्या घरात राहतो. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याने घरमालकाने त्यांना जागा सोडून जाण्यासही बजावले होते. जून 2021 मध्ये गौरी पती राहुलला सोडून माहेरी राहण्यास गेली होती. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राहुल पत्नीला पुन्हा सासरी घेऊन आला. परंतु त्यानंतरही दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयातून वाद सुरुच होते.
हत्येच्या वेळी नेमकं काय घडलं?
मंगळवारी (17 ऑगस्ट) रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घरमालकाने आपल्या फ्लॅटच्या गॅलरीतून पाहिलं असता राहुल आणि गौरी यांच्यात भांडण सुरु असल्याचं त्यांना दिसलं. यावेळी राहुल घराच्या पाठीमागे असलेल्या कच्च्या रस्त्यावर लोखंडी कोयत्याने गौरीला मारताना दिसला. त्यामुळे राहुलचा भाऊ संतोष आणि घरमालक गौरीला वाचवण्यासाठी धावत गेले. तेव्हा त्यांना पाहून राहुल लोखंडी कोयत्यासह पळून गेला.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
जखमी झालेल्या गौरीला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. तसेच हिंजवडी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. गौरीला वायसीएम हॉस्पिटलला नेले असता डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
संबंधित बातम्या :
मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधांची मामाला कुणकुण, लोखंडी दांडक्याने डोकं चिरडून हत्या
जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास