आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावा, 25 हजार कमवा, पुण्यातील 300 कारमालकांची कशी झाली फसवणूक?
स्वतःच्या वापरासाठी घेतलेल्या या गाड्या जास्त भाडे मिळणार, या लालसेपोटी अनेक जणांनी राजगुरुनगर येथील अमोल भागडे याला भाडे तत्त्वावर दिल्या. त्यासाठी अनेकांनी बँक, फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे.
पुणे : सध्याच्या काळात कोण कोणाची कशी फसवणूक करेल, याचा काही नेम नाही. असाच प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावून महिन्याला घरबसल्या पैसे कमवा, या आमिषाला अनेक जण बळी पडले आहेत. विशेष म्हणजे माजी सरपंचाकडूनच अनेक जणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
आयटी पार्कमध्ये चारचाकी कार भाड्याने लावून महिन्याला 25 हजार रुपये मिळणार, या आमिषाला भुलून अनेक जणांनी चारचाकी गाड्या घेतल्या. मात्र सध्या या गाड्या आरोपीने परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील 55 वाहनांबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातून 300 पेक्षा जास्त वाहन चालकांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माजी सरपंचाकडून फसवणूक
स्वतःच्या वापरासाठी घेतलेल्या या गाड्या जास्त भाडे मिळणार, या लालसेपोटी अनेक जणांनी राजगुरुनगर येथील अमोल भागडे याला भाडे तत्त्वावर दिल्या. त्यासाठी अनेकांनी बँक, फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. अमोल भागडेने या वाहन मालकांसोबत करारही केले. यानंतर भागडेने साबळे वाडी येथील माजी सरपंच सचिन साबळे याला ही वाहने दिली.
उडवाउडवीची उत्तरे
त्यासाठी वाहन चालकांची व्यवस्था सचिन साबळे हाच पाहणार होता. गाडी प्रत्यक्षात कुठे वापरली जाणार याबाबत मालकांनाही कल्पना नव्हती. सुरुवातीला साबळेने भाडे दिले, मात्र पुढे भाडे मिळाले नाही. याबाबत चौकशी केली असता साबळे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अनेक महिने असे घडल्यावर अमोल भागडे यानेच खेड पोलीस ठाणे गाठले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.
ऐन दिवाळीच्या वेळी आपल्या गाडीचे नेमके काय झाले असावे? या भीतीने गाडी मालकांना धडकी भरली आहे. आता खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर GPS च्या माध्यमातून वाहनांचा शोध सुरू आहे. बीड जिल्ह्यात पथके पाठवण्यात आली आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 20 वाहने ताब्यात घेतली आहेत, मात्र अजूनही मोठ्या संख्येने वाहने असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कोणकोणत्या गाड्यांचा समावेश?
खेड तालुक्यातील अशा 55 गाड्यांच्या बाबतीत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इनोव्हा, स्विफ्ट, इको, नेक्सन, हुंडाई, अर्टिगा, वॅगन आर अशा विविध कार आणि महागड्या जीपचा त्यात समावेश आहे. अशा महागड्या गाड्या जास्त भाडे मिळणार या आमिषाने दिल्या खऱ्या मात्र या गाड्या मिळतील का यासाठी आता पोलीस पथकासोबत गाडी मालकही शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
कंपनीला गाडी लावतो, भाड्यावरील 250 गाड्या परस्पर गहाण, पुण्यात माजी सरपंचाला बेड्या
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू