पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांची वसुली, हप्ता न दिल्याने दुकानात तोडफोड, मालकावर कोयता हल्ला
पिंपरी चिंचवडच्या डिलक्स चौकात हप्ता मागण्यांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलांनी रेडिमेड कपड्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्याचप्रमाणे दुकान मालकावरही कोयत्याने सपासप वार केले
पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून दुकानदारांकडून हप्ता वसुली होत असल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे एका दुकानदाराने हप्ता दिला नाही, म्हणून कोयत्याने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पिंपरी चिंचवडच्या डिलक्स चौकात हप्ता मागण्यांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलांनी रेडिमेड कपड्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्याचप्रमाणे दुकान मालकावरही कोयत्याने सपासप वार केले. मिस्टर मॅड या दुकानात घडलेली ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात व्यापारी वर्गात मोठी घबराट पसरली आहे.
दरम्यान, दुकानात तोडफोड करणारे अल्पवयीन आरोपी हे पिंपरी चिंचवडचे स्थानिक रहिवासी असल्याची माहिती आहे. दुकान मालकाच्या तक्रारीवरुन पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तिघा अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राम भोगलेंच्या कंपनीत गुंडगिरी
दरम्यान, औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.
काय घडलं होतं?
आमच्या कारखान्यातील एका कामगाराने डायल्युटेड सोप वाटर प्यायलं होतं. त्यानंतर आम्ही त्या कामगाराला रुग्णालयात भरती केलं, मात्र त्यानंतर आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने आमच्या कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. यानंतर पोलीस येतायत म्हटल्यानंतर या सगळ्यांनी पळ काढला पण असे प्रकार सातत्याने आणि उद्योगात सर्वत्र घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं राम भोगले या प्रकारानंतर म्हणाले होते.
उद्योगपतीची कामगाराला मारहाण
दरम्यान, उद्योगपतीनेच कामगाराला मारहाण केल्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. औरंगाबादमधील एमआरए लॉजीस्टिक कंपनीच्या मालकाने कामगाराला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘काम का देत नाही?’ असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याचा आरोप झाला होता. राजू फकिरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर मुकेश शरावत असं मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाचे नाव आहे. मारहाण प्रकरणी कामगाराने औरंगाबादमधील वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगून खंडणीवसुली, औरंगाबादमध्ये दादागिरी करणारे दोघे रंगेहाथ
CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण
VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप