‘भाईचा बड्डे’ जेलमध्ये, येरवडा कारागृहातील गुन्हेगाराच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या पंटरना बेड्या
शुभम वाणी हा गुन्हेगार याच्यावर हत्या आणि मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो सध्या पुणे जिल्ह्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शुभम वाणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या टोळीमधील सदस्यांना पोलिसांनी जेरबंद केले.
पिंपरी चिंचवड : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या टोळीतील सदस्य पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. पुण्यातून पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून तलवार-कोयत्यासारखी धारदार शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे टोळीतील गुंडांना आता ‘भाईचा बड्डे’ गजाआडच साजरा करावा लागणार आहे.
काय आहे प्रकरण?
शुभम वाणी हा गुन्हेगार याच्यावर हत्या आणि मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो सध्या पुणे जिल्ह्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शुभम वाणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या टोळीमधील सदस्यांना पोलिसांनी जेरबंद केले.
तिघांना दिघीमधून अटक
हे आरोपी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिघी येथे येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून तिघांना दिघीमधून अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून तलवार-कोयता जप्त
प्रशांत बुद्रुक, अभय खंडागळे, प्रणव बारसे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह अनिकेत यादगिरे, प्रसाद बुद्रुक, अक्षय गायकवाड, सुंदर गवळी आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून एक तलवार, एक कोयता जप्त करण्यात आला आहे.
पुण्यात मयत गुंडाच्या जन्मदिनी शक्तिप्रदर्शन
याआधीही, पुण्यातील हत्या झालेल्या सराईत गुंडाच्या वाढदिवसाला त्याच्या टोळक्यातील सदस्यांनी तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केले होते. त्यावेळी शस्त्र वापरुन दहशत माजवल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती. मयत गुंड भावेश कांबळेच्या नावाने घोषणाबाजी करत टोळक्याने तलवार-पिस्तुल नाचवलं होतं.
संबंधित बातम्या :
मयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक
बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन
पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स, 22 वर्षीय तरुणाला अटक