मागाल ते देतो, काळजाच्या तुकड्याला सोडा, पुण्यातील अपहृत चिमुरड्याच्या वडिलांची भावनिक पोस्ट, नेटिझन्स हळहळले
माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला कृपया फोन करु नका, कधी झालं, कसं झालं, अपहरण वगैरे वगैरे.. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल, तर प्लीज फोन करा, असं आवाहन सतीश चव्हाणांनी केलंय
पुणे : पुण्यातील बालेवाडी (Balewadi) हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचा अद्याप शोध लागलेला नाही. स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण सोशल मीडियावरुन अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन करताना दिसत आहेत. हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा, अशी आर्त विनवणी सतीश चव्हाण करत आहेत. याशिवाय, स्वर्णवला ताप आला असल्यास, त्याला कोणतं कफ सिरप द्यावं, याबद्दलही सतीश चव्हाणांनी माहिती दिली आहे. त्याच प्रमाणे चार वर्षांच्या लहान मुलासाठी औषध विकत घ्यायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवा, असं आवाहनही चव्हाणांनी फार्मसी स्टोअर चालकांना केलं आहे. सतीश चव्हाणांची अगतिकता पाहून नेटिझन्सही हळवे झाले आहेत.
सतीश चव्हाण यांची फेसबुक पोस्ट काय?
17.1.2022. 7 am – माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला कृपया फोन करु नका, कधी झालं, कसं झालं, अपहरण वगैरे वगैरे.. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल, तर प्लीज फोन करा. ज्या कोणी त्याला नेलंय, मला माझा मुलगा परत द्या, फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ, प्लीज आम्हाला फोन करा, अशी विनवणी सतीश चव्हाण यांनी फेसबुकवरुन केली आहे. सोबत त्यांनी स्वर्णव चव्हाण याचा फोटोही शेअर केला आहे.
माझ्या मुलाला क्रोसिन डीएस सस्पेन्शन हेच कफ सिरप आवडतं, त्याला ताप असल्यास हे द्या, अशी विनंतीही चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. तर, चार वर्षांच्या लहान मुलासाठी औषध विकत घ्यायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवा, असं आवाहनही सतीश चव्हाणांनी सर्व फार्मसी स्टोअर चालकांना केलं आहे. तो कमजोर असल्यामुळे कुटुंबापासून दुरावल्यानंतर आजारी पडला असेल, असं ते म्हणतात.
स्वर्णव सापडल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत, तो आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित असल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, कृपया कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन सतीश चव्हाण यांनी केलं आहे.
महेश लांडगे यांचं आवाहन
भाजप आमदार महेश लांगडे यांनीही स्वर्णवचा फोटो जारी केला होता. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळणाऱ्या दुचाकीचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. स्वर्णव चव्हाण या मुलाचं काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा चालवणाऱ्या व्यक्तीनं अपहरण केल्याचा संशय आहे. संबंधित गाडीवरील क्रमांक 8531 असून इतर अक्षरं दिसत नाहीत किंवा तो फोटो खोटा असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं संबंधित व्यक्ती किंवा मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास आमदार महेश लांडगे यांच्याकडे किंवा मुलाच्या कुटुंबीयाकंडे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
स्वर्णव चव्हाणचं वर्णन
सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव चव्हाण याचं वय 4 वर्षं असून उंची 3 फुट आहे. बांधा सडपातळ असून केस काळ्या आणि सोनेरी रंगाचे आहेत. अपहरण झालं त्यावेळी त्यानं निळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो.
नागरिकांना अपहरणकर्ता किंवा स्वर्णव चव्हाण यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास ती पोलीस किंवा चव्हाण कुटुंबीयांकडे द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :