पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकासह चौघांचे निलंबन
ज्ञानेश्वर पिंगळे यांच्यासह मुख्य लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे यांना निलंबित करण्यात आलंय.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकासह चार कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
वर्क ऑर्डर मिळवण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने बुधवारी स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली होती.
पिंगळे यांच्यासह मुख्य लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे यांना निलंबित करण्यात आलंय.
स्थायी समितीच्या अध्यक्षांवरही कारवाई
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. नितीन लांडगे यांच्यासह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 9 लाखाच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन लांडगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल कारवाई केली होती.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या. या प्रकरणात सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र कुठलेही पुरावे मिळाले नसल्याने न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
एसीबीच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप संघर्ष
एसीबीच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची बैठक पार पडली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या कार्यालयात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली गेली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
संबंधित बातम्या :
पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी प्रकरण, स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी