Pimpari-Chinchwad Crime : मध्य प्रदेशच्या अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी-चिंचवड पोलिसांची झटापट, एक पोलीस जखमी
सकाळी साडेअकरा बाराच्या सुमारास संशयित वाहनं टोल नाक्यावरून पुढे सरकत होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील पोलिसांनी जीवाची परवा न करता सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पिंपरी-चिंचवड : मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगारांसोबत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या झालेल्या झटापटीत एक पोलीस जखमी झाला आहे. तर सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार अट्टल गुन्हेगार उर्से येथील डोंगरात पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडे अकरा-बारा वाजताच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली. दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्याने एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.
सापळा रचून सहा आरोपींना अटक, चार फरार
मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. या दरम्यान सकाळी साडेअकरा बाराच्या सुमारास संशयित वाहनं टोल नाक्यावरून पुढे सरकत होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील पोलिसांनी जीवाची परवा न करता सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यातील तीन ते चार जण बाजूच्या डोंगरामध्ये पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील सर्व पथके घटनास्थळी दाखल झाले असून अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
काल मध्य प्रदेशातून आणलेले 14 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतूस पोलिसांनी पकडले
मध्य प्रदेशातील एका टोळीने पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतूस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने हस्तगत केले आहेत. पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडीमध्ये काही जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने परिसरात सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून दुचाकी, पिस्तुल, जिवंत काडतूसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा माल हस्तगत केला. अटक करण्यात आलेले आरोपी हे शस्त्र विक्रीसह एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. (Pimpri-Chinchwad police clash with Madhya Pradesh’s criminals, one policeman injured)
इतर बातम्या
Indapur : इंदापूर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल, दोघांना ताब्यात घेतले