Pune News : जावायाची करामत, सासूकडून हवे होते दहा लाख रुपये, मग असे काही की सर्वांना बसला धक्का
Pune Crime News : पुणे शहरात जावायाने मोठे प्रताप केले. सासूकडून पैसे हवे होते म्हणून त्याने अख्या कुटुंबाला वेठीस धरले. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. पोलीस आरोपीच्या शोधासाठी कामाला लागले. परंतु आरोपी तर कुटुंबातील व्यक्तीच निघाला.
सुनिल थिगळे, पिंपरी चिंचवड | 1 सप्टेंबर 2023 : नुकताच अधिक महिना गेला. या महिन्याला धोंड्याचा महिना म्हटला जातो. जावाई अन् मुलीला बोलवून धोंड्याचे वाण दिले जाते. परंतु पुणे जिल्ह्यातील या जावायाने असे काही प्रकार केले की त्याचा ताप सर्वांना झाला. सासू, मेहुणी अन् इतर कुटुंब वेठीस धरले गेले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी काही तासात या प्रकरणाचा छळा लावला. ही घटना रक्षाबंधनाच्या दिवशी घडली. या प्रकरणात जावायास अटक करण्यात आली आहे.
नेमका काय घडला प्रकार
पुणे शहराजवळील पिंपरी- चिंचवडमध्ये जावयाची करामत बघायला मिळालीय. या ठिकाणी असलेल्या ४५ वर्षीय सचिन मोहिते याला सासूकडून दहा लाख रुपये हवे होते. खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे रक्षाबंधनाच्या दिवशी अपहरण केले. त्यांना वाघोलीच्या घरी डांबून ठेवले. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी आणण्यासाठी गेलेल्या मुली घरी परत न आल्याने सचिन मोहिते यांच्यासह मुलींच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली. नातींचे अपहरण केल्याने सासू पैसे देईल, या उद्देशाने सचिन मोहिते याने अपहरण कट रचला. परंतु पोलिसांचा तपासात हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
तीन महिन्यांपूर्वी रचला कट
45 वर्षीय सचिन मोहिते याने तीन महिन्यांपूर्वी अपहरणाचा कट रचला. तेव्हाच मेहुणीचा मोबाईल त्याने चोरला होता. तोच मोबाईल गुन्ह्यासाठी वापरला. रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतःच्या मुलीचे आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर चौकशी सुरु झाली. त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत मुलांना वाघोली येथील घरात ठेवल्याचे सांगितले.
मेहुणीने दिली होती फिर्याद
सचिन मोहिते याची मेव्हणी सारिका कैलास ढसाळ (वय ३८ , रा. रहाटणी) हिने पोलिसांत फिर्याद दिली होती. तिची दोन वर्षांची मुलगी आणि सचिन मोहिते याची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळवले. त्यानंतर वाकड पोलिसांनी मुलींचा शोध सुरू केला. त्यानंतर सचिन मोहिते याच्या जबाबात विसंगतीमुळे पोलिसांना संशय बळावला आणि प्रकार उघड झाला. काही तासातच या अपहरणाचा कट उघड करत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.