एटीएम कापून पुण्यात 23 लाखांची रोकड लंपास, हरियाणात टोळीच्या मुसक्या आवळल्या
पुणे जिल्ह्यातील भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील 'एसबीआय'च्या एटीएममध्ये चोरी झाली होती. एटीएम गॅस कटरने कापून मशीनमधून पैसे ठेवण्याच्या ट्रेसह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड पळवण्यात आली होती
पिंपरी चिंचवड : एटीएम कापून 23 लाखांची रोकड चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील भोसरी पोलिसांनी हरियाणामध्ये जाऊन कारवाई केली. आतापर्यंत तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे आणखी तीन साथीदार पसार झाले आहेत. (Pune Bhosari ATM Loot Gang arrested in Haryana)
एटीएम गॅस कटरने कापले
पुणे जिल्ह्यातील भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील ‘एसबीआय’च्या एटीएममध्ये चोरी झाली होती. एटीएम गॅस कटरने कापून मशीनमधून पैसे ठेवण्याच्या ट्रेसह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड पळवण्यात आली होती. हा प्रकार 10 जून रोजी सकाळी उघडकीस आला होता.
हरियाणामधून टोळीला अटक
या टोळीला भोसरी पोलिसांनी हरियाणामधून अटक केली. अकरम दीनमोहम्मद खान, शौकीन अक्तर खान, अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार पसार आहेत. भोसरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
अटक केलेल्या आरोपींकडून चोरलेल्या रकमेपैकी 6 लाख 24 हजार 500 रुपये रोकड, गुन्हा करताना वापरलेला ट्रक, गॅस कटर, घरगुती वापराची एक गॅस टाकी, मेडिकल वापराचे दोन ऑक्सिजन सिलेंडर, एटीएममधील पैसे ठेवण्याचे तीन ट्रे, दोन कोयते, तीन मोबाईल फोन असा एकूण 26 लाख 33 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हरियाणातील आणखी एक टोळी
याआधीही महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणी गेल्या वर्षी दोघांना हरियाणामधूनच अटक करण्यात आली होती.
एटीएममध्ये अफरातफर करुन लूट
सातारा शहरातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये अफरातफर करत चालाखीने पैसे काढले. जिल्ह्यात तीन ठिकाणी कॅनरा बँकेच्या एटीएममधून ही रक्कम काढली होती. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध सातारा शाहुपुरीसह सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
या चोरट्यांचे पैसे काढतानाचे चित्रिकरण सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे काही गोपनीय माहितीच्या आधारावर सातारा पोलिसांनी संशयित आरोपींना हरियाणा येथे जाऊन पाठलाग करुन पकडले होते.
संबंधित बातम्या :
एटीएममधून लाखो रुपयांची चोरी, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, दोघांना हरियाणातून अटक
ATM Money Theft | बनावट एटीएम कार्डच्या सहाय्याने चोरी, आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड
(Pune Bhosari ATM Loot Gang arrested in Haryana)